मुद्दा – स्क्रीन टाईमची वाढती समस्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< डॉ. अंजुषा पाटील

आजकाल लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचाच स्क्रीन टाईम वाढलेला आहे. मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टीव्ही असे कोणतेही माध्यम घेतले तरी त्यावर हाताची बोटे, डोळे आणि सर्वच ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये व्यस्त असतात. एकदा का आपण स्क्रीनवर राहिलो की, वेगवेगळे अ‍ॅप कधी बदलतो ते आपल्या बोटांनाही कळत नाही.

नकळतपणे व्हॉट्सअ‍ॅपवरून फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम असे करत करत ओटीटीवरचे न संपणारे सिनेमे, शॉर्ट फिल्म आणि जाहिरातींमध्ये आपण इतके गुंतून जातो की, आपण क्षणभर स्वतःलाच हरवून जातो. खूप वेळाने एका जागी बसल्याचे चिन्ह जेव्हा हात, पाय, मान आणि डोळे दाखवू लागतात, तेव्हा अचानक घड्याळाकडे लक्ष जाते व स्वतःची चूक समजते. तासन्तास एकाच जागेवर किंवा कामासाठीही बसू नये ही साधी गोष्ट आपणा सर्वांनाच माहीत असूनही त्यात आपण गुरफटत जातो आणि मग निश्चय केला जातो, हातात मोबाईल जास्त वेळ घ्यायचाच नाही. कार्यालयातच नव्हे, तर घरात असतानाही स्क्रीन टाईम वाढतो.

माध्यमांबरोबर आपली व्यवधाने वाढत चालली आहेत. मोबाईलमधला डेटा संपत नाही, तर तो आपल्याला संपवतो असे वाटते. जेव्हा बराच वेळ आपण या सर्व गोष्टी एकटक पाहत राहतो.
त्याच त्याच बातम्या, घटना, प्रसंग एआयच्या माध्यमातून आकर्षक पद्धतीने आणि कल्पकतेने दाखवतात. त्यामुळे त्याची मनाला भुरळ पडते. नावीन्याची ओढ प्रत्येकालाच असते. मग आपण पुढे काय होईल ते पाहत राहतो आणि खेदाने म्हणतो की, अरे आजकाल स्क्रीन टाईम खूप वाढला आहे, तो कमी करायला हवा.

लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण मोबाईल वापरतात. त्यामुळे हा स्क्रीन टाईम वाढलेला आहे. तो स्क्रीन टाईम आपल्यालाच कमी करायला हवा. मनाला लावलेली शिस्त, दैनंदिन व्यवहारात प्रत्येक क्रियेला जाणूनबुजून वेळ ठरवून द्यायला पाहिजे आणि त्याचे पालन करायला हवे. ते आपल्यालाच करायचे आहे. स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी कोणीही बाहेरून येणार नाही. तो संयम, ती शिस्त स्वतःलाच पाळायला पाहिजे.

स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टीव्ही किंवा टॅबलेट यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाच्या स्क्रीनसमोर घालवलेला वेळ होय. स्क्रीनचा वापर विधायक कामासाठीही केला जातो. अभ्यास करणे, माहिती मिळवणे किंवा इतर प्रसारमाध्यमे चालवण्यासाठीही हा वेळ वापरला जातो. त्यामुळे कधी कधी आपला अधिकार वेळ वाया जातो. झोप मोड होते. स्क्रीनची सवय लागते. बेचैनी आणि चंचलपणा वाढतो. यावर अनेक उपाय आहेत, पण ते मनाशी निश्चय करून करायला हवेत.

सवयीमध्ये बदल करावेत. सकाळी उठल्याबरोबर एक तास मोबाईलला हात लावू नका. जेवताना मोबाईलचा वापर टाळा. वेळ ठरवा. जेवायला एकत्र बसा. काही वेळ नो स्क्रीन टाईम म्हणून राखून ठेवा. स्क्रीन टाईम वाढल्याने जेव्हा त्रास होतो, तेव्हा 10 मिनिटे शांत बसणे आवश्यक आहे. आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करावे. हलके हलके व्यायाम करावेत.

मोबाईलचा निळा प्रकाश मेलो टोनिनच्या उत्पादनात हस्तक्षेप करतो. जी झोपेची भावना असते त्या लयीत व्यत्यय येतो आणि झोप मोडते. त्यामुळे सकाळी माणूस बेचैन होतो. झोपेच्या अभावामुळे आरोग्य बिघडते. वजन वाढते. असे अनेक दुष्परिणाम या वाढलेल्या स्क्रीन टाईममुळे होतात. 0 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांच्या स्क्रीन टाईममध्ये 88 टक्के, टीव्ही 67 टक्के, टॅबलेट 60 टक्के, स्मार्टफोन 44 टक्के, लॅपटॉप 44 टक्के आणि गेमिंग यावर जास्त वेळ जातो. यामुळे मुले चंचल बनतात, एकलकोंडी होतात. ती मुले कोणाचेच ऐकत नाहीत. यासाठी उपाय म्हणून पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा. मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटावे. छंद जोपासावे, वाचन करावे, सद्गुरूंचे नामस्मरण करून छोटे-छोटे श्लोक, स्तोत्र म्हणावे.