हिंदुस्थानच्या माजी क्रिकेटपटूची तब्बल 22 वर्षांनी निर्दोष मुक्तता, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील 22 वर्षांपासून न्याय मिळवण्यासाठी सुरू असलेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू जेकब मार्टीन याला पटिलाया हाऊस कोर्टाने जुन्या फौजदारी गुन्ह्यातून सर्व आरोपांकडून निर्दोष मुक्त केले आहे. तब्बल दोन दशकांनंतर मिळालेल्या या न्यायामुळे आपल्यावरचा एक मोठा कलंक धुतला गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ABP ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेकब मार्टीनवर 2004 मध्ये यूके दौऱ्यादरम्यान बनावट इमिग्रेशन स्टॅम्प, आर्थिक व्यवहार आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्याचे गंभीर आरोप होते. मूळ एफआयआरमध्ये त्यांचे नाव नसतानाही ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असल्यामुळे तपासात त्यांचे नाव जोडण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणाचा त्यांच्या आयुष्यावर आणि करिअरवर वाईट परिणाम झाला, ज्यामुळे त्यांची रेल्वेची नोकरीही गेली आणि बीसीसीआयनेही कोणतीही मदत केली नाही. मात्र, खटल्यादरम्यान कोर्टात पुरावे न सापडल्याने आणि साक्षीदार आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या या निकालानंतर जेकब मार्टिन यांनी सुटकेचा श्वास सोडला असून, हा निकाल आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.