
ज्या बिबट्याला संपूर्ण जंगलात शिकारीचा राजा मानले जाते, त्याच महाबळवान बिबट्याला विषारी सापाने यमसदनी पाठवल्याची एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर १ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री मृतावस्थेत आढळलेल्या मादी बिबट्याच्या मृत्यूचे गूढ अखेर शवविच्छेदन अहवालातून उलगडले असून, कोणत्याही वाहनाच्या धडकेने नव्हे तर सर्पदंशामुळे या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
रविवारी मध्यरात्री सुमारास गोळवली ते तुरळ दरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध एक मादी बिबट्या मृतावस्थेत पडलेला आढळला. या मार्गावरून जाणाऱ्या एका प्रवाशाने तातडीने याची माहिती वन विभागाला दिली. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत बिबट्याला ताब्यात घेतले आणि साडवली येथे आणले. सुरुवातीला हा मृत्यू एखाद्या अज्ञात वाहनाच्या धडकेने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. मात्र, जेव्हा साखरपा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले, तेव्हा सत्य समोर आले. बिबट्याचे शरीरातील सर्व अवयव सुस्थितीत होते. अंगावर कोणत्याही शिकारीच्या किंवा मानवी हल्ल्याच्या खुणा नव्हत्या. मृत्यूचे नेमके कारण ‘सर्पदंश’ असल्याचे अहवालात निष्पन्न झाले.
या अहवालामुळे “बिबट्याची शिकार झाली असावी” किंवा “तो वाहनाखाली आला असावा” या दोन्ही चर्चांना व शंकांना पूर्णविराम मिळाला आहे. घटनेची गंभीर दखल घेत विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर-देवरुखच्या वनपालांनी प्र.गु.रि. क्रमांक वप्रार २४/२०२६ अन्वये नोंद केली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृत मादी बिबट्यावर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. ”मोठमोठ्या श्वापदांना घाबरवणारा बिबट्या अखेर एका लहानशा विषारी सापाचा शिकार ठरला,” ही चर्चा सध्या परिसरात मोठी उत्सुकता आणि आश्चर्य ठरत आहे




























































