‘जनतेला राहुल गांधींकडून जे अपेक्षित आहे, तेच ते करत आहेत’, राहुल गांधींच्या आंदोलनाला ओमर अब्दुल्लांचा पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

20 जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकावर पेलेट गनचा वापर केल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर केलेल्या धरणे आंदोलनाला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी पेलेट गनच्या कथित वापराप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात आले होते. 20 जुलैच्या आंदोलनात एका आंदोलकावर पेलेट गनचा वापर केला असून, या प्रकरणात एफआयआर दाखल करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली होती.

दरम्यान, श्रीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना ओमर अब्दुल्ला यांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेचे समर्थन केले. “देशातील जनतेला राहुल गांधींकडून जे अपेक्षित आहे, तेच ते करत आहेत. विरोधी पक्षनेत्याचे काम सरकारला जाब विचारणे आणि सरकारला उत्तरदायी बनवणे हे आहे. राहुल गांधी हेच काम करत आहेत. त्यांनी हे काम असेच सुरू ठेवावे, अशी माझी इच्छा आहे,” असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.

राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते म्हणून सरकारला प्रश्न विचारणे आणि जनतेच्या प्रश्नांवर सरकारला उत्तर देण्यास भाग पाडणे सुरू ठेवावे, असेही ओमर अब्दुल्ला यांनी यावेळी सांगितले.