सामना अग्रलेख – आपली आदर्श निवडणूक पद्धती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातीलएसआयआरच्या खेळात सर्वच विरोधी पक्षांनी अति सावधान राहणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील दोन कोटी मतदारांची नावे आता वगळण्यात आली. मतदार यादीतला भ्रष्टाचार आणि घोटाळा हेच भाजपचे नवे हत्यार आहे. ते हत्यार आता बोथट करावे लागेल. प्रे. ट्रम्प यांना भारतातील निवडणूक पद्धत आदर्श, पारदर्शक वाटत असेल तर त्यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या संपूर्ण यंत्रणेसह अमेरिकेला घेऊन तेथील निवडणुका घ्याव्यात. ते प्रे. ट्रम्प यांना हव्या तशा निवडणुका घेऊन दाखवतील भारतातील महान लोकशाहीप्रमाणे अमेरिकेच्या लोकशाहीची विल्हेवाट लावतील, याविषयी आमच्या मनात शंका नाही.

भारताच्या निवडणूक पद्धतीचे काैतुक प्रे. ट्रम्प यांनी केले आहे अशी जोरदार चर्चा भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सुरू केली आहे. एका गुन्हेगाराने दुसऱ्या गुन्हेगाराला चारित्र्याचे प्रमाणपत्र देण्याचाच हा प्रकार आहे. या घडीला जगातली सगळ्यात ‘विकाऊ’ आणि सदोष निवडणूक यंत्रणा कोणती असेल तर ती भारताची. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेतून 2 कोटी 7 लाख मतदार अपात्र ठरवण्याचे महान कार्य निवडणूक आयोगाने अंतिम टप्प्यात आणले आहे. हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. मतदार यादीच्या पुनरीक्षणाची प्रक्रिया जटिल व गोंधळ उडवणारी आहे. ज्या राज्यात शाळांचे मुख्याध्यापक दारू पिऊन पडतात, मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी रस्ते नाहीत, आश्रमशाळेतल्या मुली सर्पदंशाने मरतात, गरीबांना आपली जीवनावश्यक कामे करून घेण्यासाठी पावलोपावली चिरीमिरी द्यावी लागते, त्या राज्यातला पिचलेला मतदार मतदार फेरतपासणीच्या लढाईत कोठे तग धरणार? प. बंगालात ऐन विधानसभा निवडणुकीत 80 लाख मतदारांना वगळले गेले व त्याच बळावर भाजप सत्तेवर आला. बिहारमध्येही तोच खेळ खेळला गेला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान अचानक 42 लाख मतदार वाढवून चमत्कारच केला. हे 42 लाख मतदार अवतरले कुठून? त्यांचा आगापीछा काय याचा खुलासा महाराष्ट्राचा निवडणूक आयोग करू शकला नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या मतदार यादी घोटाळ्याचे सत्य कथन केले आहे. मतदारांची नावे वगळणे, दुबार मतदारांना संरक्षण देणे व त्यांच्या नावावर संध्याकाळी

बोगस मतदान

करून घेणे, असे उद्योग तेव्हा निवडणुकीच्या काळात घडवून आणले गेले. याला काही आदर्श निवडणूक पद्धती मानता येणार नाही. आता पुन्हा राज्यातील दोन कोटींवर मतदारांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यावर आयोगाचे म्हणणे आहे की, 75.52 लाख मतदारांनी यादीत नावे नोंदवण्यात अनास्था दाखवली. 17 लाख मतदारांची नावे दुबार असल्याने ती वगळण्यात आली. आता एक स्वच्छ, पवित्र मतदार यादी प्रसिद्ध होईल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत लाखो दुबार मतदारांनी वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केले. त्याबाबत पुरावे देऊनही निवडणूक आयोग अथवा कोर्टाने दखल घेतली नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार राजन विचारे यांनी लाखो दुबार, बोगस मतदारांचे पुरावेच निवडणूक आयोग व न्यायालयाला दिले, पण हा सर्व प्रकार भिंतीवर डोके आपटून घेण्यासारखाच ठरला. ‘एसआयआर’चे काम करण्यासाठी राज्यातील एक लाख बुथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) मैदानात उतरले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोकलिंगम सांगतात, ‘‘सर्व ‘बीएलओं’नी केलेले काम हे काैतुकास्पद आहे. प्रत्येक बीएलओने त्याच्याकडे असलेल्या परिसरातील घरांमध्ये तीन-तीन वेळा भेटी दिल्या. त्यांनी खूप मेहनत केली.’’ हे सगळे ठीक आहे, परंतु मुख्य प्रश्न निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा आणि शुद्धतेचा आहे. निवडणूक आयोग तसा निष्पक्ष राहिला आहे का? हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्रात निष्पक्ष निवडणुका घेण्याची जबाबदारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यावर आहे, पण देशाचा मुख्य निवडणूक आयोग आदर्श आणि निष्पक्ष राहिलेला नाही. तो

भाजपचा एजंट

व अमित शहांचा हरकाम्या आहे. प. बंगाल, बिहारातील विधानसभा निवडणुकांत त्यांनी केलेली डाकूगिरी उघड झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील ‘एसआयआर’च्या खेळात सर्वच विरोधी पक्षांनी अति सावधान राहणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील दोन कोटी मतदारांची नावे आता वगळण्यात आली. त्यात साधारण 35 लाख मृत मतदार आहेत. प. बंगालात हजारो मतदार हे जिवंत असताना मृत दाखवून त्यांना मतदानापासून वंचित ठेवले गेले. बिहारात एका विशिष्ट धर्माचे हजारो मतदार मृत म्हणून घोषित केले गेले आणि आपण जिवंत असल्याची चार पिढ्यांची कागदपत्रे आणा तरच तुम्ही मतदार असा आदेश दिल्लीच्या निवडणूक तुघलकांनी काढला. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप नवनवे फंडे शोधत असते. ते अनेकदा विरोधकांच्या लक्षात येत नाहीत. या वेळी मोठ्या प्रमाणात ‘जेन झी’ मतदार वगळले जाण्याची भीती आहे. कारण या मोठ्या नवमतदार वर्गाने मोदी-शहा-फडणवीसांच्या विरोधात बंड पुकारले आहे. त्यामुळे त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न नक्की होईल. तो हाणून पाडायला हवा. पुणे, नागपूर, नाशिक, मुंबई, रायगड, छत्रपती संभाजीनगरातील तरुणांनी सरकारविरुद्ध आंदोलने केली. त्यामुळे या शहरातील तरुण वर्गाला अधिक सावध राहावे लागेल. मतदार यादीतला भ्रष्टाचार आणि घोटाळा हेच भाजपचे नवे हत्यार आहे. ते हत्यार आता बोथट करावे लागेल. प्रे. ट्रम्प यांना भारतातील निवडणूक पद्धत आदर्श, पारदर्शक वाटत असेल तर त्यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या संपूर्ण यंत्रणेसह अमेरिकेला घेऊन तेथील निवडणुका घ्याव्यात. ते प्रे. ट्रम्प यांना हव्या तशा निवडणुका घेऊन दाखवतील व भारतातील महान लोकशाहीप्रमाणे अमेरिकेच्या लोकशाहीची विल्हेवाट लावतील, याविषयी आमच्या मनात शंका नाही.