मध्य रेल्वेवर डिसेंबरपर्यंत १५ डबा लोकल ‘शंभरी’पार; सीएसएमटीतील प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाला गती मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या लोकलमधील जीवघेण्या गर्दीचा प्रश्न दूर करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली असून वर्षाखेरीपर्यंत मेन लाईनवर १५ डबा लोकलच्या फेऱ्यांची संख्या थेट १०० हून अधिक करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण केले जाणार आहे. सीएसएमटी आणि टिटवाळा येथील प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण होताच १५ डबा लोकल फेऱ्या वाढवण्यात येतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ पाच प्रवाशांचा लोकलमधून खाली पडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या. त्याचाच एक भाग म्हणून १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात आला आणि ३७ उपनगरी रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यातील बहुतांश स्थानकांवर ते काम पूर्ण झाल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर मेन लाईनवर आणखी २२ लोकल फेऱ्या १५ डब्यांच्या लोकल म्हणून चालवण्यात येत आहेत. त्यामुळे १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या ५४वर गेली असून ती पुढील चार महिन्यांत थेट १००च्या पुढे नेण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. सध्या ५ ते ६ स्थानकांवर प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम बाकी आहे. ती कामे लवकरच पूर्ण होतील.

सीएसएमटी व टिटवाळा येथील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम कठीण आहे. विविध अडचणी दूर करून दोन्ही स्थानकांतील कामे तीन ते चार महिन्यांत पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर १०० हून अधिक १५ डबा लोकल फेऱ्या चालवणे शक्य होईल. त्यामुळे प्रत्येक गाडीची प्रवाशी क्षमता २५ टक्क्यांनी वाढेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

टिटवाळ्यातील काम पूर्ण होताच १२ फेऱ्या वाढणार
टिटवाळा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे पुढील दोन महिन्यांत काम पूर्ण होताच आणखी १० ते १२ लोकल फेऱ्या १५ डब्यांच्या लोकल म्हणून चालवण्यात येतील. जलद मार्गावरील एकूण २७८ लोकल फेऱ्यांपैकी ४५ लोकल वातानुकूलित आहेत.

१५ डब्यांच्या लोकल फेऱ्या जलद मार्गावर चालवण्यात येत असून या फेऱ्यांची संख्या १००च्या पुढे नेताना जलद लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल केला जाणार आहे. सध्या डाऊनला जाणाऱ्या जलद गाड्या रिटर्न येत असताना धिमी लोकल बनून सीएसएमटीकडे येतात. त्यात बदल करून डाऊनला गेलेल्या जलद गाड्या रिटर्न प्रवासात सीएसएमटीकडे येताना जलद लोकल म्हणूनच चालवण्यात येणार आहेत.