
पाऊस आणि धबधब्यात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी कुर्ल्यातील एका शाळेचे दहावीचे १५ विद्यार्थी खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर गेले. शाळा बुडवून या विद्यार्थ्यांनी पिकनिकसाठी पांडवकडा गाठला, पण तेथे अनुचित प्रकार घडला. त्यातील १४ विद्यार्थी सुखरूप घरी परतले, तर एक विद्यार्थी कायमचाच सर्वांपासून दुरावला. तेथील डबक्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
कुर्ला पश्चिमेकडील फ्रेंड्स कॉलनीत कार्तिक हायस्कूल ही शाळा आहे. या शाळेत प्रणव राकेश मिश्रा (१५) हा मुलगा दहावीच्या वर्गात शिकत होता. प्रणव व त्याच्या बरोबरच्या अन्य १४ विद्यार्थ्यांनी मंगळवारी शाळेत न जाता खारघर येथील पांडवकडा येथे पोहण्यासाठी जाण्याचा बेत आखला. ठरल्याप्रमाणे १५ विद्यार्थी मंगळवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडले, पण शाळेत जाण्याऐवजी त्यांनी थेट पांडवकडा धबधबा गाठला. दरम्यान, त्यातील १४ विद्यार्थी घरी सुखरूप परतले, पण प्रणव घरी आला नाही.
शाळा सुटून बराच वेळ झाला तरी प्रणव घरी न परतल्याने घरच्यांनी विनोबा भावे नगर पोलीस ठाणे गाठून मुलगा हरवल्याची तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक अमित ताड यांनी याची गंभीर दखल घेत निरीक्षक अंबिके यांच्यासह मुलाचा शोध सुरू केला.
नको ते समोर आले
अंबिके व पथकाने शाळेत चौकशी सुरू केली तेव्हा मंगळवारी दहावीच्या वर्गातले १५ विद्यार्थी गैरहजर असल्याचे समजले. पथकाने त्या गैरहजर मुलांना विश्वासात घेऊन विचारपूस करण्यास सुरुवात केली; परंतु ते घाबरलेले होते व काय सांगावे हेच त्यांना समजत नव्हते. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी शिताफीने मुलांना बोलते केल्यावर प्रणव पाण्यात बुडाल्याचे समोर आले.
अंबिके व पथकाने लगेच पांडवकडा धबधबा गाठला. तेथे शोधाशोध केल्यावर निष्पाप प्रणवचा मृतदेह मिळून आला. “आम्ही मित्र पोहण्यासाठी तेथे गेलो होतो, पण प्रणव खोल पाण्यात गेल्यानंतर पुन्हा बाहेर आलाच नाही,” असे त्याच्या मित्राने सांगितले. दहावीत शिकणाऱ्या प्रणवचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.























































