
शुक्रवार, २८ ऑगस्टला बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणजेच रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे. हा दिवस प्रत्येक बहीण आणि भावासाठी अतिशय खास असतो. प्रत्येक बहिणीला आपल्या भावासाठी सर्वोत्तम राखी खरेदी करायची असते आणि त्याच्यासाठी स्वादिष्ट मिठाई आणायची असते.
बाजारात विकल्या जाणाऱ्या बहुतेक मिठाई सारख्याच असतात, ज्यात आपुलकी आणि प्रेमाची कमतरता असते. येत्या रक्षाबंधनाला बाजारातील मिठाई आणण्याऐवजी तुम्ही तुमच्या भावासाठी घरीच चविष्ट ‘शेंगदाणा बर्फी’ बनवू शकता. ही मिठाई केवळ चविष्टच नाही, तर यात तुमचे प्रेमही दडलेले असेल. ही मिठाई शेंगदाण्यापासून बनवली जात असली तरी ही मिठाई दिसायला आणि चवीला हुबेहूब बदाम बर्फीसारखीच लागते.
साहित्य:
शेंगदाणे: 500 ग्रॅम
साखर: 300 ते 400 ग्रॅम (आवडीनुसार गोडव्यासाठी)
पाणी: 250 मिली (साखरेच्या निम्मे प्रमाण)
केशर
हिरवी वेलची: 7 ते 8
मावा (खवा): 500 ग्रॅम
साजूक तूप : 2 मोठे चमचे
सजावटीसाठी: बदाम किंवा इतर ड्रायफूट्स
शेंगदाणा पाक कसा बनवावा?
- टरफले काढलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पावडर तयार करा.
- गॅसवर कढई ठेवून त्यात पाणी आणि साखर टाका. साखर विरघळून पाणी थोडे चिकट वाटू लागले की पाक तयार होईल.
- या पाकात केशराच्या काड्या, वेलची पूड आणि किसलेला मावा (खवा) टाका. हे सर्व मंद आचेवर सतत ढवळत राहा.
- मावा पूर्णपणे विरघळून पेस्टसारखा झाला की त्यात २ चमचे तूप किंवा लोणी टाका आणि नीट मिक्स करा.
- आता यात शेंगदाण्याची पावडर घालून सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत व्यवस्थित ढवळा.
- एका मोठ्या ताटाला तूप लावून घ्या. तयार शेंगदाणा बर्फीचे सारण त्यात काढून जाड थरामध्ये नीट पसरवून घ्या.
- हा पाक काही तास सेट होण्यासाठी ठेवून द्या.
- सेट झाल्यावर सुरीने त्याच्या बर्फीच्या आकाराच्या वड्या कापून घ्या. प्रत्येक बर्फीवर एक-एक बदाम किंवा आवडीचे ड्रायफ्रुट लावून सजवा. तुमचा टेस्टी आणि होममेड ‘शेंगदाणा पाक’ तयार आहे.



























































