महाराष्ट्रातील ‘एसआयआर’ : गोंधळ कशामुळे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमलेश कणेकर

[email protected] 

मतदाराला 2002 च्या मतदार यादीशी ‘मॅप’ करण्याचा मूलभूत निर्णय – ज्यामध्ये त्याचे आई–वडील, भावंडे आणि आजी–आजोबा यांच्या नोंदण्यांशी संबंध जोडणे अपेक्षित आहे, हाच मुद्दा सध्याच्या मतदार यादीतील अनागोंदीच्या मुळाशी आहे. या प्रक्रियेसाठी वापरले जात असलेले सॉफ्टवेअर याला जबाबदार आहे का? तसे निष्पन्न झाल्यास असे का घडले याच्या मूळ कारणांचे विश्लेषण झाले पाहिजे. या संपूर्ण प्रक्रियेच्या रचनेचे वर्णन हे अतार्किक नियम, अनाकलनीय प्रशासकीय प्रक्रिया आणि सामान्य माणसाला असहाय्य करून टाकणारी व्यवस्था असे करावे लागेल.

 सध्या महाराष्ट्रात मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) चालू आहे, परंतु या अतिशय महत्त्वाच्या प्रक्रियेची सामान्य माणसाला फारशी माहिती नाही असे लक्षात येते. ‘एसआयआर’ची अचंबित करणारी एक नवी प्रक्रिया म्हणजे डिस्क्रिपॅन्सी मतदार जर डिस्क्रिपॅन्सी यादीत आला, तर याचा अर्थ असा की त्या मतदाराच्या मतदानाच्या हक्काला भारताच्या निवडणूक आयोगाने आव्हान दिले आहे आणि वर्षानुवर्षे आपल्याकडे असलेला हा मूलभूत हक्क सिद्ध करण्याची जबादारी मतदारावर पडते. महाराष्ट्रात लाखो मतदारांवर ही वेळ आली व त्यांची त्रेधातिरपीट उडाली.

डिस्क्रिपॅन्सी हा विषय अधिक खोलात समजून घेण्याआधी हे मान्य केले पाहिजे की, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग व त्याचे लाखो कर्मचारी – बीएलओ, डीईओ, ईआरओ, एआरओ व बूथ पातळीवरचे स्थानिक कार्यकर्ते यांनी गेले काही महिने अथक परिश्रम करून हा डिस्क्रिपॅन्सीचा आकडा आता चांगलाच आटोक्यात आणला आहे. ‘‘इथे आम्ही प. बंगाल, बिहार होऊ देणार नाही,’’ असे ठोकून सांगणारे अधिकारी जनतेसाठी उभे राहिले आणि त्यांनी महाराष्ट्रधर्म पाळला. परंतु देशात करोडो मतदार नागरिकांची या डिस्क्रिपॅन्सी प्रक्रियेने क्रूर थट्टा कशी केली हे समजून घेतले पाहिजे.

मुंबई जिह्यातील 181-माहीम विधानसभेचे उदाहरण घेऊ. मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या 1 लाख 60 हजारांच्या (1,60,000) आत आहे. त्यातील तब्बल 48,173 म्हणजे 31 टक्के मतदार डिस्क्रिपॅन्सी यादीत टाकण्यात आले होते. या लेखाचा मुख्य विषय माहीम मतदारसंघ असला तरी बाजूच्या वडाळ्यातली टक्केवारी तुलनात्मक होती ती 27 टक्के . आयोगाच्या संकेतस्थळावर मार्च 2023 चे ‘मॅन्युअल ऑन इलेक्टोरल रोल्स’ उपलब्ध आहे.

पहिल्याच पानावर म्हटले आहे- ‘नो वोटर टू बी लेफ्ट बिहाईण्ड्’  (कुठलाही मतदार वगळला जाऊ नये). परंतु दर तिसऱया मतदारास जर आयोग आव्हान देत असेल तर 2026च्या ‘एसआयआर’चे ध्येयवाक्य ‘जमतील तितके मतदार वगळावेत’ असे आहे की काय असा विचार मनात येतो.

आयोगाच्या भूमिकेचा ठोस संकेत हा 31/5/2026 च्या अधिसूचना क्र. ECI/PN/96/2026 याद्वारे मिळतो. यात म्हटले आहे – ‘एसआयआर’चे मुख्य उद्दिष्ट असे आहे की, कोणताही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळला जाऊ नये आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचा मतदार यादीत समावेश होऊ नये. वास्तविक हे दोन उद्देश आहेत. त्यातील पहिला आधी म्हटल्याप्रमाणे ‘मॅन्युअल’मध्ये समाविष्ट आहेच. मात्र दुसरा हेतू हा मूळ ब्रीदवाक्यात केलेला अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गंभीर बदल ठरतो. मूळ मॅन्युअलमध्ये हा बदल करण्याऐवजी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी नसलेल्या डेप्युटी डायरेक्टरने काढलेल्या अधिसूचनेद्वारे हा बदल करण्यात आला आहे ही बाब आश्चर्यकारक आहे. नेमक्या याच बदलाचा फटका लाखो मतदारांना बसला.

मतदारसंघाच्या पातळीवर डिस्क्रिपन्सीतील मतदारांची टक्केवारी 31 टक्के असली तरी त्यातील एकूण 243 बूथपैकी 23 मधील ही टक्केवारी 50 पेक्षा अधिक होती. याचा 15,360 मतदारांवर प्रतिकूल परिणाम झाला. सर्वात हलाखीची अवस्था ज्या केंद्रांची झाली, त्यांचे तपशील सोबतच्या तक्त्यात दिले आहेत. एखाद्या बूथमधील 99 टक्के मतदार डिस्क्रिपन्सीत जातात याचा काय अर्थ लावावा?

14 ऑक्टोबर 2026 रोजीच्या ‘द हिंदू’ या वृत्तपत्रातील एका लेखात दिल्लीतील ‘एसआयआर’मध्ये डिस्क्रिपन्सी याद्यांमध्ये धार्मिक पक्षपात घडला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इथे म्हणजे 181 माहीममध्ये असे घडले आहे का?

प्रथमदर्शनी असे काही दिसत नाही. 90 टक्क्यांपेक्षा अधिक डिस्क्रिपन्सी असलेले क्र. 62 हा माहीममधील बूथ अल्पसंख्याकबहुल आहे आणि 233, 234, 148, 88 या क्रमांकांचे बूथ दादर-प्रभादेवी येथील बहुसंख्याकबहुल आहेत.

मतदार यादी आणि डिस्क्रिपन्सी यादीतील पुरुष व महिलांच्या प्रमाणाचा अभ्यास करता डिस्क्रिपन्सी यादीतील महिलांचे प्रमाण (57 टक्के) हे मतदार यादीतील महिलांचे प्रमाण (51 टक्के) यापेक्षा किंचित जास्त आहे. मात्र हा फरक फार मोठा नसल्याने त्यावरून पक्षपात असल्याचा संशय घेण्याचे कारण दिसत नाही.

मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात विजयाचे मताधिक्य केवळ 1,316 होते हे लक्षात घेतले पाहिजे. निवडणूकपूर्व युती, त्यावेळची राजकीय परिस्थिती हे मुद्दे क्षणभर बाजूला ठेवले तर अकारण वगळल्या गेलेल्या मतदारांचा फटका निवडणुकीत कोणाला बसेल हे सांगणे खूप कठीण आहे. थोडक्यात असल्या ‘एसआयआर’ प्रक्रियेमुळे एखादी निवडणूक जीवघेण्या जुगारासारखी ठरू शकते. असे घडल्यास ते लोकशाहीस बाधक ठरेल. परंतु हा विश्लेषणाचा केवळ आरंभ आहे. अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक समुदायांची मतदारसंघनिहाय विभागणी तसेच 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील विजयाचे मताधिक्य अशा विविध निकषांच्या आधारे प्रत्येक मतदारसंघाचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. ते सध्या सुरू आहे.

काय घडले आहे याचे विश्लेषण करत असताना ते का घडले, त्यास कोण जबाबदार आहे याचे संशोधन व उकल करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेसाठी वापरले जात असलेले सॉफ्टवेअर याला जबाबदार आहे का? तसे निष्पन्न झाल्यास असे का घडले याच्या मूळ कारणांचे विश्लेषण (रूट कॉझ ऍनालिसिस) झाले पाहिजे.

मला असे वाटते की, मतदाराला 2002 च्या मतदार यादीशी ‘मॅप’ करण्याचा मूलभूत निर्णय – ज्यामध्ये त्याचे आई-वडील, भावंडे आणि आजी-आजोबा यांच्या नोंदण्यांशी संबंध जोडणे अपेक्षित आहे. हाच मुद्दा सध्याच्या मतदार यादीतील अनागोंदीच्या मुळाशी आहे. या संपूर्ण प्रक्रियेच्या रचनेचे वर्णन हे अतार्किक नियम, अनाकलनीय प्रशासकीय प्रक्रिया आणि सामान्य माणसाला असहाय्य करून टाकणारी व्यवस्था असे करावे लागेल.

बूथ क्रमांक  बूथचे वर्णन  मतदारांची संख्या  डिस्क्रिपन्सीतील मतदारांची संख्या डिस्क्रिपन्सी %

233 मुंबई पब्लिक स्कूल, मुरारी घाग मार्ग, प्रभादेवी  406  403 99.00 %

234 केतकी मैदान, राजाभाऊ देसाई मार्ग, प्रभादेवी  596  585 98.00%

148 बालमोहन विद्यामंदिर, मधुकर राऊत मार्ग, दादर  675  661 98.00%

88   व्हिक्टोरिया हायस्कूल, लेडी जमशेटजी रोड, माहीम  815  737  90.00%

62  अंजुमन इस्लाम प्राथमिक विद्यालय, लेडी जमशेटजी रोड, माहीम  815  730 90.00%