जेलमध्ये असताना जीवन संपवायचा विचार केला होता, शिल्पाच्या एका फोनमुळे राज कुंद्नाने निर्णय बदलला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्योगपती आणि अभिनेता राज कुंद्रा आपल्या स्पष्टवक्त्या वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतो. मात्र, 2021 मधील पॉर्नोग्राफी प्रकरणातील अटकेनंतर त्याच्या आयुष्यात अत्यंत कठीण काळ आला होता. तुरुंगात असताना आपले जीवन संपवण्याचा विचार मनात आल्याचा धक्कादायक वक्तव्य राज कुंद्राने नुकतेच केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्या काळातील मानसिक संघर्षाबद्दल सविस्तर भाष्य केले.

राज कुंद्राला 2021 मध्ये अश्लील कंटेंटची निर्मिती आणि वितरणाशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे त्याचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले. त्याच काळात राज आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या नात्याबाबतही अनेक अफवा पसरल्या होत्या.

शिल्पा राजला सोडून जाणार असून दोघांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली होती. या अफवांचा राजवर मोठा मानसिक परिणाम झाला. याबाबत बोलताना त्याने सांगितले की, तुरुंगातील परिस्थितीशी तो आधीच संघर्ष करत होता. त्यातच शिल्पा आपल्याला सोडून जाणार असल्याची बातमी समोर आल्याने तो पूर्णपणे खचला. या बातमीनंतर त्या रात्री आपल्याला झोप आली नाही आणि जीवन संपवण्याचा विचार मनात आला, असे राजने सांगितले.

राज म्हणाला की, त्याच्यासाठी पत्नी आणि कुटुंब सर्वात महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तेही आपल्यापासून दूर गेले तर जगण्यात काही अर्थ उरणार नाही, असे त्या वेळी त्याला वाटले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी शिल्पाशी झालेल्या फोनवरील संभाषणाने परिस्थिती बदलली. शिल्पाने राजला धीर देत त्याच्यासोबत असल्याचे सांगितले. तसेच, आपला त्याच्यावर पूर्ण विश्वास असल्याचेही तिने स्पष्ट केले. शिल्पाच्या या शब्दांमुळे राजला मोठा आधार मिळाला. जग त्याच्याविरोधात बोलत असले तरी पत्नी आपल्यासोबत आहे, ही भावना त्याला त्या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी महत्त्वाची ठरली असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.

राज कुंद्राला 2021 मध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लील कंटेंटच्या निर्मिती आणि वितरणाशी संबंधित प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणाचा तपास फेब्रुवारी 2021 मध्ये मड आयलंड परिसरातील एका बंगल्यावर झालेल्या छाप्यानंतर सुरू झाला होता. तपासादरम्यान काही ॲप्स आणि त्यांच्याशी संबंधित कंटेंट निर्मितीचे आरोप समोर आले. त्यानंतर 20 सप्टेंबर 2021 मुंबईतील दंडाधिकाऱ्यांनी राज कुंद्राला जामीन मंजूर केला होता.