
चेहरा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी फेसवॉश हा स्किन केअर रुटीनमधील महत्त्वाचा भाग आहे. बाजारातील महागडे फेसवॉश वापरण्याऐवजी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या काही पदार्थांपासून नैसर्गिक फेसवॉश तयार करता येतो. बेसन, कस्तुरी हळद, चंदन पावडर, मुलतानी माती आणि तांदळाचे पीठ या पाच पदार्थांपासून हे मिश्रण तयार करता येते.
फेसवॉश बनवण्यासाठी लागणारे साहित्य
२ चमचे बेसन, २ चमचे चंदन पावडर, १ चमचा मुलतानी माती, १ चमचा कस्तुरी हळद आणि १ चमचा तांदळाचे पीठ घ्यावे. हे सर्व साहित्य ठेवण्यासाठी एक स्वच्छ आणि हवाबंद डबा घ्यावा.
असा तयार करा नैसर्गिक फेसवॉश
सर्वप्रथम एका स्वच्छ आणि कोरड्या भांड्यात बेसन, कस्तुरी हळद, चंदन पावडर, मुलतानी माती आणि तांदळाचे पीठ घेऊन चांगले मिसळून घ्यावे. तयार झालेले मिश्रण हवाबंद डब्यात ठेवावे.
फेसवॉश वापरताना साधारण दोन चमचे मिश्रण घेऊन त्यात आवश्यकतेनुसार गुलाबजल घालून पेस्ट तयार करावी. त्वचा कोरडी असल्यास गुलाबजलाऐवजी दूध किंवा थोडे मध वापरता येऊ शकते.
चेहरा आधी पाण्याने हलका ओला करून घ्यावा. त्यानंतर तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हाताने लावावी. साधारण १० ते १५ मिनिटे ती ठेवून नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.
त्वचेसाठी काय होऊ शकतात फायदे?
बेसन त्वचेवरील धूळ, घाम आणि अतिरिक्त तेल स्वच्छ करण्यास मदत करू शकते. कस्तुरी हळदीमध्ये त्वचेसाठी उपयुक्त गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसण्यास मदत होऊ शकते.
चंदन पावडर त्वचेला थंडावा देण्यास तसेच जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करू शकते. मुलतानी माती त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेण्यास मदत करते. त्यामुळे तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी ती उपयुक्त ठरू शकते.
तांदळाचे पीठ त्वचेला हलक्या पद्धतीने एक्सफोलिएट करण्यास मदत करू शकते. त्यामुळे मृत त्वचा दूर होऊन चेहरा अधिक स्वच्छ आणि नितळ दिसण्यास मदत होऊ शकते.
फेसवाॅश लावताना या गोष्टी लक्षात ठेवा
पहिल्यांदा हे मिश्रण चेहऱ्यावर वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करणे महत्त्वाचे आहे. खाज, जळजळ, लालसरपणा किंवा अन्य त्रास जाणवल्यास त्याचा वापर त्वरित थांबवावा.
फेसवॉश चेहऱ्यावर लावताना त्वचा जोरात घासू नये. तसेच हे मिश्रण दिवसातून दोन वेळा वापरण्याची गरज नाही. आपल्या त्वचेचा प्रकार आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन त्याचा वापर करावा.




























































