अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा, पाच महिन्यांत १.९५ लाख सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक; मल्लिकार्जुन खरगे यांची केंद्र सरकारवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी मोदी सरकारवर सोशल मीडिया सेन्सॉरशिपच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला. मार्च ते जुलै २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना तब्बल १.९५ लाख अकाउंट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिल्याचे खरगे यांनी म्हटले आहे. हा प्रकार म्हणजे प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकांच्या बोलण्याच्या, प्रश्न विचारण्याच्या आणि असहमती दर्शवण्याच्या लोकशाही अधिकारांवर हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मल्लिकार्जुन खरगे X वर एका पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “मोदी सरकारने प्रत्येक हिंदुस्थानींच्या लोकशाही अधिकारावर हल्ला केला आहे. त्यांची सोशल मीडियावरील सेन्सॉरशिप ही आमच्या तरुणांवर वापरण्यात आलेल्या लाठीचार्ज आणि पेलेट गनइतकीच निंदनीय आहे.”

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, अवघ्या पाच महिन्यांत सरकारने सुमारे १.९५ लाख ब्लॉकिंगचे आदेश दिले आहेत. याचा अर्थ दर ६८ सेकंदाला एक अकाउंट ब्लॉक केले जात आहे. खरगे म्हणाले की, “हे आदेश गुन्हेगारांविरुद्ध नाहीत, तर त्या विद्यार्थ्यां आणि तरुणांविरुद्ध आहेत जे आपल्या भविष्यासाठी आणि परीक्षांमधील गैरप्रकारांबद्दल न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. एकीकडे दिवसाढवळ्या त्यांची हाडे मोडली जात होती आणि त्याच वेळी त्यांच्या समर्थनार्थ येणारी प्रत्येक पोस्ट आणि व्हिडीओ सरकारच्या आदेशाने इंटरनेटवरून पद्धतशीरपणे काढून टाकली जात होती.”