हिंदुस्थान-पाकिस्तान महायुद्धाचा थरार; हॉकी विश्वचषकात टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ सामना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील महायुद्धाचा थरार पुन्हा एकदा चाहत्यांना अनुभवता येणार आहे, पण हे महायुद्ध रंगणार आहे ते हॉकी विश्वचषकात. हॉकी विश्वचषकाच्या ‘ड’ गटामध्ये दुसऱ्या सामन्यात हिंदुस्थानच्या हॉकी संघाला इंग्लंडकडून 2-4 असा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या पराभवानंतर हिंदुस्थानचा संघ तीन गुणांसह गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धचा सामना हिंदुस्थानसाठी ‘करो या मरो’ असाच असणार आहे. कारण हा सामना जिंकला तरच हिंदुस्थानचा संघ पुढच्या फेरीत पोहोचू शकतो.

गेल्या सामन्यात काय घडलं होतं

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि दिलप्रीत सिंग यांच्या गोलमुळे हिंदुस्थानने 2-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या सत्रात झालेल्या बचावात्मक चुकांमुळे इंग्लंडने जोरदार पुनरागमन केले आणि तिसऱ्या व चौथ्या क्वार्टरमध्ये सलग तीन गोल करून सामना 4-2 ने खिशात घातला. इंग्लंडकडून बोंडुरकने दोन गोल केले, तर रश्मियर आणि क्रॉफ्ट यांनी प्रत्येकी एक गोल केला होता.

हिंदुस्थान दुसऱ्या फेरीत कसा पोहोचू शकतो

पराभवासह हिंदुस्थानचा संघ दोन सामन्यांतून तीन गुणांसह ‘ड’ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे, तर पाकिस्तान आणि वेल्स प्रत्येकी एका गुणासह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. हिंदुस्थानचा सामना आता कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात हिंदुस्थानसाठी विजय हा अनिवार्य असणार आहे. जर हिंदुस्थानने पाकिस्तानचा पराभव केला तर इंग्लंड विरुद्ध वेल्स सामन्याच्या निकालाची पर्वा न करता हिंदुस्थान 6 गुणांसह दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरणार आहे. मात्र, जर सामना बरोबरीत सुटला तर हिंदुस्थानला 4 गुण मिळतील. या परिस्थितीत जर इंग्लंडने वेल्सला हरवले किंवा सामना बरोबरीत सुटला तर हिंदुस्थान पात्र ठरेल. वेल्सने इंग्लंडला हरवले तर हिंदुस्थान आणि वेल्स दोघांनाही प्रत्येकी 4 गुण मिळतील आणि निर्णय गोलफरकावर घेतला जाईल. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाकिस्तानवर मात करण्याची सुवर्णसंधी

महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारताचे माजी दिग्गज हॉकीपटू पी.आर. श्रीजेश यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. हिंदुस्थानला पाकिस्तानवर मात करण्याची ही सुवर्णसंधी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी श्रीजेश म्हणाले की, ‘चार-सत्र’ पद्धत सुरू होण्यापूर्वीच आम्ही आमची तंदुरुस्ती, ताकद, खेळाची समज आणि निर्णयक्षमता यामध्ये मोठी सुधारणा केली होती. त्यामुळेच आता पाकिस्तानविरुद्धचे सामने पूर्वीइतके कठीण राहिलेले नाहीत. पूर्वी हिंदुस्थान-पाकिस्तान सामने अत्यंत चुरशीचे असायचे आणि अनेकदा ते 1-0 किंवा 2-1 अशा फरकाने संपायचे. पाकिस्तानमध्ये अजूनही क्षमता आहे, पण त्यांच्या सध्याच्या संघाचा दर्जा पूर्वीसारखा राहिलेला नाही.’