
बीड जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या 19 वर्षीय महिलेवर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर तिने बाळाला जन्म दिला आणि काही दिवसांनी तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र, घरी गेल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी तिच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यानंतर खासगी रुग्णालयात तपासणी केली असता शस्त्रक्रियेदरम्यान पोटात वैद्यकीय हातमोजे आणि पेपर नॅपकीन राहिल्याचे आढळून आले.
बीड जिल्हा रुग्णालयातील या धक्कादायक प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हे रुग्णालय विविध कारणांमुळे चर्चेत आहे. रुग्णालयातील शिस्त, नियोजन आणि कामकाजावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत असून, आरोग्य यंत्रणेतील निष्काळजीपणाचा फटका थेट रुग्णांना बसत असल्याचा आरोप होत आहे.
संध्या सुरज गायकवाड या 19 वर्षीय महिलेला सुमारे 15 दिवसांपूर्वी बाळंतपणासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांनी बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
मात्र, घरी गेल्यानंतर चार दिवसांनी संध्या यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. त्रास वाढत गेल्याने कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले. तेथे सोनोग्राफी केल्यानंतर त्यांच्या पोटात काहीतरी अनोळखी वस्तू असल्याचे आढळून आले.
संध्या यांची प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने कुटुंबीयांनी त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेदरम्यान संध्या यांच्या पोटातून वैद्यकीय हातमोजे आणि कागदी नॅपकीन बाहेर काढण्यात आले.
शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय साहित्य पोटातच राहिल्यामुळे संध्या यांच्या पोटात गंभीर संसर्ग झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
‘दोषींवर कठोर कारवाई करा’
संध्या यांच्या प्रकृतीला बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप त्यांचे पती सुरज गायकवाड यांनी केला आहे. या प्रकरणातील संबंधित दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सीएसकडून चौकशीचे आदेश
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक सोळंकी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, चौकशीसाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे.
या चौकशीच्या अहवालातून नेमकी चूक कुठे झाली, शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय साहित्य पोटात कसे राहिले आणि या प्रकरणात कोणाची जबाबदारी निश्चित होते, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे चौकशी समितीच्या अहवालाकडे आता लक्ष लागले आहे.





























































