मला एक संधी द्या, मी वीरप्पनला पकडून आणतो; यशने सांगितला बालपणीचा भन्नाट किस्सा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाक्षिणात्य सुपरस्टार यश सध्या आपल्या आगामी ‘टॉक्सिक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत यशने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना त्याच्या शाळेतील दिवसांमधील एक मजेदार किस्सा सांगितला. यशने सांगितले की, लहानपणी शाळेत तो डायलॉग मारायचा, नृत्य करायचा आणि त्यामुळे शिक्षकांसह इतर विद्यार्थी त्याला ‘हीरो’ म्हणून हाक मारायचे.

यशने सांगितले की, लहानपणी त्याने आपल्या आई-वडिलांना खूप त्रास दिला. त्याला पाहून अनेक जण ‘हा आयुष्यात काहीच करणार नाही’ असे म्हणायचे. मात्र, आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीने आपल्याला पुढील मोठ्या संघर्षासाठी तयार केले, असे आता वाटते, असे यशने सांगितले.

यशने आपल्या शालेय जीवनातील सर्वात मजेदार आठवण सांगताना कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनचा उल्लेख केला. त्या काळात वीरप्पनचा मुद्दा दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर चर्चेत होता. यश म्हणाला की, शाळा आणि कॉलेजमध्ये त्याला प्रत्येकजण ‘हीरो’ म्हणायचा. शिक्षकही त्याला गंमतीने, काय हीरो, आज उशीर का झाला? किंवा काय केलंस? असे विचारायचे. त्यामुळे आपण जन्मापासूनच हीरो आहोत, असा विश्वास त्याच्यात निर्माण झाला होता.

याच काळात तो शाळेत वीरप्पनबद्दल डायलॉग मारायचा. यशने सांगितले की, तो म्हणायचा, ‘मला एक संधी द्या आणि सुट्टी द्या, मी जाऊन वीरप्पनला पकडून आणतो.’ त्याच्या या संवादामुळे शाळेत चांगलाच माहोल तयार व्हायचा. विद्यार्थी त्याच्या डान्सचे आणि अभिनयाचे कौतुक करायचे. यशच्या मते, शाळेतील या वातावरणामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. लहानपणी मिळालेल्या या कौतुकाने आणि लोकांनी ‘हीरो’ म्हणून दिलेल्या ओळखीने त्याच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा परिणाम केला.

यशने आपल्या पालकांचेही कौतुक केले. त्याचे आई-वडील स्वतःच्या जोरावर आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला देत असत. ‘कोणाकडे काही मागू नका आणि कोणासमोरही अशी परिस्थिती निर्माण करू नका की तुमचं डोकं खाली झुकावं,’ हे पालकांनी शिकवल्याचे यशने सांगितले. त्यामुळे आजच्या यशाचे श्रेय तो आपल्या पालकांच्या संस्कारांनाही देतो.