मोखाडा सर्दी, तापाने फणफणला; रुग्णालये, दवाखाने हाऊसफुल्ल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा सुरू झाल्यापासून मोखाडा तालुक्यात साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत तर तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढल्याने मोखाडा तापाने फणफणला आहे. जून महिन्याच्या तुलनेने सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण दीड पटीने वाढले असून सरकारी दवाखाने आणि खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत.

मोखाड्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळला. तर ऑगस्ट सुरू होताच ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. या बदलामुळे मोखाड्यात सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले आहेत.
मोखाड्यातील आसे, खोडाळा, वाशाळा आणि मो-हांडा या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णांची गर्दी होत आहे. सरकारी अहवालावरून जून महिन्यात तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांत ८ हजार ४१७ रुग्णांनी उपचार घेतले. यामध्ये २२ रुग्ण सर्पदंशाचे, ५९६ रुग्ण ताप आणि ७ हजार ४६१ सर्दी खोकल्याचे आढळले आहेत.

८ ऑगस्टपर्यंत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत १० हजार ९४६ रुग्णांची तपासणी झाली असून यामध्ये ६५ रुग्ण सर्पदंशाचे, १ हजार २० रुग्ण तापाचे तर ९ हजार ३९० रुग्ण सर्दी खोकल्याचे आढळून आले आहेत. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयातसुद्धा रुग्णांची गर्दी होत आहे. टायफॉइड, कावीळ आणि तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने येत असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले. सर्वच ठिकाणी तापाचे रुग्ण सर्वाधिक आहेत.

वातावरणातील बदलाला तालुक्यात साथसदृश आजार वाढले आहेत. सर्पदंश अथवा जल जन्य आणि कीटकजन्य आजारांमुळे मागील दोन महिन्यांत वाढ झाली असली तरी मृत्यूची घटना कुठेही घडली नाही. सर्व आरोग्य केंद्रांत औषधसाठा उपलब्ध असून रुग्णांवर योग्य उपचार केले जात आहेत.
भाऊसाहेब चत्तर, तालुका वैद्यकीय अधिकारी.