अंबरनाथमध्ये मनसे-भाजपात तुफान राडा, भाजपच्या दोन नगरसेवकांवर गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवाजीनगर परिसरात एका खासगी मालमत्तेच्या वादातून 11 ऑगस्ट रोजी भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. या राड्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक अभिजित करंजुले आणि पवन वाळेकर यांच्यासह संतोष शिंदे, शुभम शिंदे, लक्ष्मीनारायण चौहान, भारत म्हेत्रे, श्रीकांत रेड्डी यांच्यासह अज्ञात हल्लेखोरावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारातच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के तसेच कार्यकर्त्यांना मारहाण करत गाडीची तोडफोड केली. यावेळी पोलिसांनी शैलेश शिर्के यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. मात्र भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नसल्याने मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. यावर भाजप जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसेकडून कोणत्याही प्रकारची फिर्याद दिली नसल्याचा मुद्दा मांडला होता. अखेर याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मनसेचे जखमी कार्यकर्ते सुहास घाग यांच्या तक्रारीवरून शनिवारी रात्री उशिरा हल्लेखोरावर गुन्हा दाखल केला. त्यामुळे पोलीस ठाण्यावर निघणारा मोर्चा मनसेने स्थगित केला.

पाच दिवसांनंतर गुन्हा

भाजप नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी मनसे पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्यानंतर पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. सत्तेच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला जात नसल्याने मनसे आक्रमक झाली होती. मारहाण करणारे भाजप पदाधिकारी खुलेआम फिरत होते आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना मात्र अटक केल्याने तणाव होता. मनसेने मोर्चाचा इशारा दिल्यानंतर अखेर भाजप पदाधिकाऱ्यांवर पाच दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.