
पावसाने दिवसाचा निम्म्याहून अधिक वेळ वाया भिजवला, पण उरलेल्या 43 षटकांत हिंदुस्थानने श्रीलंकेच्या गोलंदाजांची दमछाक करत 9 बाद 460 धावांचा डोंगर उभा केला. शतकावर नाबाद असलेल्या देवदत्त पडिक्कलला द्विशतकाची संधी होती, पण त्याची झंझावाती खेळी 167 धावांवर थांबली. त्याच्या फटकेबाजीमुळे हिंदुस्थानला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने झेप घेता आली. दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कुलदीप यादव आणि प्रसिध कृष्णा ही शेवटची जोडी मैदानात होती.
आज हिंदुस्थानने फक्त 172 धावांची भर घातली. यजमान श्रीलंकेचा पदार्पणवीर केशरा नुवान्थाने आज कमालीचा मारा करत सर्वांचे लक्ष वेधले. सलग 16 षटके गोलंदाजी टाकताना त्याने हिंदुस्थानला तीन धक्के देत लंकेच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण केले होते. ऋषभ पंत (39), के. एल. राहुल (82) आणि रवींद्र जाडेजा यांना बाद करत त्याने हिंदुस्थानच्या धावांना ब्रेक लावण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्याने 175 धावा मोजल्या असल्या तरी आज तीन धक्के दिले. त्याला प्रभात जयसूर्याने चार विकेट घेत समर्थ साथ दिली. पण ही फिरकी जोडी आज हिंदुस्थानचा डाव संपवण्यात थोडक्यात अपयशी ठरली.
आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर थंडावलेल्या वातावरणात नाबाद पडिक्कल आणि पंतने शांतच फलंदाजी केली. या शांत प्रारंभाला आक्रमक करण्याच्या प्रयत्नात पंतने आपली विकेट गमावली. आक्रमकतेच्या नादात तो मिडऑफवर झेल देऊन परतला. त्यानंतर काल जखमी झालेला राहुल पुन्हा मैदानात आला, पण तोही फार काळ टिकला नाही. त्याने 82 धावांपर्यंत मजल मारली. दुसरीकडे पडिक्कलने फिरकीसमोर क्रिझचा अफलातून वापर करत आपली फलंदाजी खुलवली आणि 150 धावांचा टप्पाही सहज पार केला. त्याला आज द्विशतकाची सुवर्णसंधी होती, पण त्याची खेळी 167 धावांवर संपली. त्याच्या या खेळीत 15 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
त्यानंतर ध्रुव जुरेलने 51 धावांची संयमी खेळी करत डाव सावरला. जुरेल आणि मानव सुथार यांनी 55 धावांची भागीदारी करत हिंदुस्थानला 377 धावांनंतरही मोठी मजल मारून दिली. अखेरीस मोहम्मद सिराजने नुवान्थाला षटकार ठोकत आक्रमक इरादा दाखवला, मात्र तो लगेच बाद झाला.
दिवसअखेर कुलदीप यादव 12 आणि प्रसिध कृष्णा 1 धावांवर नाबाद होते. श्रीलंकेच्या फिरकीने हिंदुस्थानला हादरे दिले असले तरी 460 ही धावसंख्या हिंदुस्थानला सामन्यावर मजबूत पकड मिळवून देणारी ठरली आहे.
आपली तिसरीच कसोटी खेळत असलेल्या पडिक्कलने अडीच वर्षांपूर्वी धर्मशाळा कसोटीत इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले होते. पहिल्या डावात 65 धावा करणाऱ्या पडिक्कलला मग ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीत आणखी एक संधी मिळाली. मात्र त्या कसोटीत तो 0 आणि 25 धावाच करू शकला होता. मात्र त्यानंतर तब्बल 21 महिन्यांनी पुनरागमन करणाऱ्या पडिक्कलने आपले पहिलेवहिले शतक साकारले. आज त्या शतकाला दीडशतकी साज चढवला. त्याचा खेळ पाहून तो द्विशतकही पूर्ण करेल असे वातावरण होते. मात्र त्याची 230 चेंडूंची आक्रमक खेळी प्रभात जयसूर्याने 167 धावांवर रोखली.
64 षटके पावसाचाच खेळ
पहिल्या दिवशी 73 षटकांचा खेळ झाला होता, मात्र दुसऱया दिवशी तो 43 षटकांपर्यंत पोहोचला. तब्बल 47 षटके पावसाच्या व्यत्ययामुळे टाकता आली नाहीत. त्यामुळे आज झालेल्या निम्म्या खेळात फक्त 172 धावाच फटकावल्या. आज हिंदुस्थानच्या डावात ध्रुव जुरेलने सर्वाधिक 51 धावांची भर घातली. त्याच्या खालोखाल 36 धावा पडिक्कलने काढल्या. म्हणजे गेल्या दोन दिवसात एकूण 64 षटकांची फलंदाजी पावसानेच केली आहे.





























































