
क्रिकेटविश्वातील सर्वात मोठ्या क्रिकेट महासंग्रामाला महात्मा गांधींच्या जन्मदिनी सुरुवात करण्याचा विचार आयसीसीकडून सुरू आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणारा आयसीसी वर्ल्ड कप अर्थातच वन डे वर्ल्ड कप तब्बल 50 दिवस रंगण्याची शक्यता असून, 2 ऑक्टोबर 2027 रोजी स्पर्धेचा नारळ फुटू शकतो. आयसीसीने अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
महात्मा गांधींचे दक्षिण आफ्रिकेशी असलेले ऐतिहासिक नाते पाहता गांधी जयंतीला स्पर्धेची सुरुवात करण्यामागे विशेष अर्थ आहे. गांधींनी हिंदुस्थानात परतण्यापूर्वी तब्बल 21 वर्षे दक्षिण आफ्रिकेत वास्तव्य केले होते. त्यामुळे क्रिकेटच्या महासंग्रामातून त्यांच्या शांतता आणि अहिंसेच्या संदेशाला मानवंदना देण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. यापूर्वी 8 ऑक्टोबरला स्पर्धा सुरू करण्याचा प्रस्ताव होता. आता सराव सामने सप्टेंबरच्या अखेरीस खेळविण्याची शक्यता आहे.
50 दिवस, 3 देश आणि 12 शहरे!
14 संघांच्या या वर्ल्ड कपचा अंतिम सामना 21 नोव्हेंबर 2027 रोजी खेळविण्याची योजना आहे. दक्षिण आफ्रिकेतील वांडरर्स, सेंच्युरियन, न्यूलँड्स, किंग्समीड, सेंट जॉर्ज पार्क, मंगाउंग ओव्हल, बोलँड पार्क आणि बफेलो पार्क; झिम्बाब्वेतील हरारे, बुलावायो आणि व्हिक्टोरिया फॉल्स; तर नामिबियातील विंडहोक येथे सामने रंगणार आहेत.
वर्ल्ड कपचा फॉरमॅटही नवा
सुरुवातीला तीन संघांची सुपर सीरिज होईल. त्यातून एक संघ बाहेर पडेल. उर्वरित 12 संघांची दोन गटांत विभागणी होऊन प्रत्येकी सहा संघ असतील. त्यानंतर सुपर सेवन टप्पा, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना असा खिताबाचा प्रवास असेल.
दहा संघांची जागा पक्की
यजमान दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेसह हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांनी पात्रता निश्चित केली आहे. उर्वरित चार जागांसाठी पुढील वर्षी दहा संघांचा पात्रता सामना रंगणार असून नामिबिया, वेस्ट इंडिज आणि आयर्लंडसह अन्य संघ त्यात झुंजतील.

























































