
विकासकामांमध्ये मलनिस्सारण प्रकल्पाला अतिशय महत्त्व आहे. पण मीरा-भाईंदर महापालिकेचा मलनिस्सारण प्रकल्प तब्बल १७ वर्षे लटकला असून आतापर्यंत फक्त १ हजार ७८५ जोडण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ७५० कोटींचा खर्च पाण्यात गेला आहे. काही ठिकाणी तर सांडपाणी रस्त्यांवर व नाल्यांमधून वाहात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
मीरा-भाईंदर शहरातील मलनिस्सारण प्रकल्पाची सुरुवात २००९ मध्ये झाली. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सहा एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) उभारण्यात आले आहेत. मात्र हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याचे आढळून आले आहे. काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी नियोजित ११ हजार ३२८ ड्रेनेज जोडण्यांपैकी केवळ १ हजार ७८५ जोडण्या म्हणजेच सुमारे १५ टक्के जोडण्या प्रत्यक्षात देण्यात आल्याचे महासभेत सांगितले.
आयुक्तांचे थातूरमातूर उत्तर
महासभेत शहरातील मलनिस्सारण प्रकल्पाबाबत विरोधकांनी प्रश्न निर्माण केला असताना पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी थातूरमातूर उत्तर दिले. भाईंदर शहरातील ११ प्रकल्पांपैकी एक प्रकल्प मिठागर व महापालिकेच्या वादात प्रलंबित आहे. काही ठिकाणी हवा खारट व दमट असल्याने दोन प्रकल्पांचे मशीन बंद आहे. उर्वरित ठिकाणी मलनिस्सारण जोडणी करण्याचे काम सुरू असून शहराची लोकसंख्यादेखील झपाट्याने वाढत असल्याने प्रकल्प पूर्ण होण्यास उशीर होत असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.




























































