
सक्षम न्याय व्यवस्था व राज्य घटनेस ‘पंगू’ करून, या दोन्ही संस्थांत दहशत निर्माण करून पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून स्थिर सरकार असल्याची थापेबाजी केली, तीसुद्धा भारतीय तिरंग्याच्या साक्षीने. मोदी स्वातंत्र्य दिनी परंपरेप्रमाणे देशाशी व जनतेशी खोटे बोलले. त्यांच्या राजवटीत देशाची शिक्षण व्यवस्था, अर्थ व्यवस्था, निवडणूक आयोग, न्याय व्यवस्था यासारख्या संस्थांचे पूर्ण अधःपतन झाले आहे. जंतर मंतरवर तरुणांच्या असंतोषाचा उद्रेक झाला तेव्हा मोदींचे धाबे दणाणले. ते गायब झाले ते थेट लाल किल्ल्यावर प्रकटले. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात थापांच्या तोफा उडवून त्यांनी बारा वर्षांची परंपरा कायम राखली. अर्थात या तोफा लवकरच थंडावतील, असे देशातले वातावरण आहे.
देशाच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपती व पंतप्रधानांनी भाषणे केली. दोघांनीही राष्ट्र के नाम संदेश दिला. जंतर मंतरवरील तरुणांच्या आंदोलनानंतर युवाशक्तीच्या ज्वालामुखीचे भय राज्यकर्त्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधताना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, ‘‘युवाशक्ती हीच राष्ट्राची मौल्यवान संपत्ती आहे. यापुढे पेपर लीक होणार नाहीत.’’ राष्ट्रपतींना 80 व्या स्वातंत्र्य दिनी पेपरफुटीवर बोलावे लागले. राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा हा गेल्या काही वर्षांत एक खेळ बनला आहे. प्रत्येक महत्त्वाच्या परीक्षेचे पेपर्स फुटू लागल्याने देशाची सार्वजनिक परीक्षा पद्धती किती पोखरली आहे, त्यामुळे युवकांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त झाले आहे, ते दिसले. सरकार आता सार्वजनिक परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा करणार असल्याचे राष्ट्रपती महोदयांनी सांगितले. राष्ट्रपती या स्वतःच्या मन की बात मांडत नाहीत. सरकारने लिहून दिलेल्या भाषणाचे वाचन करतात. त्यामुळे एका अर्थाने राष्ट्रपतींचे भाषण हे मोदींचीच ‘मन की बात’ असते. राष्ट्रपती म्हणाल्या, ‘देशातला बहुसंख्य युवक आता शिकून नोकरीच्या मागे लागत नाही, तर ‘नोकऱया’ निर्माण करणारा उद्योगशील बनत आहे. युवकांनी आपली मजबूत स्टार्टअप इको सिस्टीम बनवली आहे. युवकांमधील ऊर्जा, प्रतिभा, जिद्द भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने गती देत आहे.’ भारताच्या राष्ट्रपतींना विकासातील गतिशीलता वगैरे दिसली हे आश्चर्य आहे. अदृश्य किंवा हरवलेल्या गोष्टी पाहण्याची दिव्य शक्ती सध्याच्या राज्यकर्त्यांना प्राप्त झाली आहे, पण प्रत्यक्ष वास्तव वेगळे आहे. स्टार्टअप वगैरेमधला फोलपणा उघडा पडला आहे. बेरोजगार तरुणांची फौज प्रत्येक वर्षी निर्माण होते व त्यांच्यातील अस्वस्थता, असंतोष जागोजाग दिसतो. जंतर मंतरवर जमलेले फक्त ‘नीट’ परीक्षार्थी नव्हते तर नोटबंदी, कोविड, सरकारची आर्थिक धोरणे व अकार्यक्षमता यामुळे नोकऱ्या आणि
रोजगार गमावलेले लाखो तरुण
होते. दहा-बारा वर्षांत या वर्गाला सरकारने जी स्वप्ने दाखवली, ती पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे जंतर मंतरवर तरुण पोरांनी ज्या अनेक घोषणा दिल्या त्यातील एकः
‘‘बाप की चड्डी फटी पडी है
घर में चुल्हा जलता नहीं है
और बच्चे ‘मोदी-मोदी’ चिल्ला रहे है…’’
पोरांना धर्मांध, कावडिया वगैरे बनवून सत्ताधाऱयांनी हिंदुत्वाच्या भूलथापांत गुंतवले आणि नशेबाज करून ठेवले, ही देशाची स्थिती आहे. जे राष्ट्रपतींनी सांगितले तेच पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून गरजले. स्वातंत्र्य दिनाआधी भाजपवाल्यांनी सात-आठ दिवस ‘तिरंगा यात्रा’ काढून पोरांना त्यात गुंतवले, खरं तर तिरंगा हे विकसित भारताचे स्वप्न आहे. स्वातंत्र्य, लोकशाहीचे प्रतीक आहे. मोदी आता लाल किल्ल्यावरून 2036 आणि 2047 ची स्वप्ने दाखवतात, पण 2029 नंतर ना मोदी राहतील, ना त्यांचे सत्तेतले टोळभैरव. मोदी यांनी 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ‘टॅलेंट हंट’ उपक्रमाची घोषणा केली. मोदी यांनी वास्तविक त्यांच्या सरकारमध्ये व भाजपमध्ये ‘टॅलेंट’ शोधण्याचा उपक्रम राबवायला हवा. त्यांच्यातील टॅलेंट किती घसरले याची कल्पना सध्या पावला पावलावर येत आहे. राम मंदिराच्या दानपेट्या लुटल्या गेल्या यावर भाजपमधील ‘टॅलेंट’ने सांगितले की, ‘हिंदूंचा पैसा हिंदूंनीच लुटला. त्यावर इतके आकांडतांडव करायची गरज काय?’ हे असे टॅलेंटवाले आपले राज्यकर्ते आहेत. मोदींचे भाषण हे पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठsला शोभणारे नव्हते. भाषणात त्यांनी विचार कमी आणि कुचाळक्याच जास्त केल्या. एका बाजूला राष्ट्रपती युवाशक्तीचे गुणगान गातात, तर त्यांच्याच सरकारचे पंतप्रधान मोदी हे युवक, बुद्धिवंत मंडळींना
‘दिमागी नक्षल’
ठरवतात. मोदी बारा वर्षांत मोठी झेप घेऊ शकले नाहीत व तोच तोच चिखल तुडवीत राहिले. देशातील आंदोलनकारी युवकांना मोदींनी ‘दिमागी’ म्हणजे ‘मानसिक नक्षल’ म्हटले. लोकांनी त्यांना हुडकून त्यांचा बहिष्कार करावा, असे पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून बोलणे हे निरोगी मानसिकतेचे लक्षण नाही. मोदींनी लाल किल्ल्यावरून सांगितले की, ‘भारताकडे जनतेचा स्पष्ट काwल, स्थिर सरकार, सक्षम न्याय व्यवस्था आणि स्वतःची राज्यघटना आहे.’ मोदी जे सांगतात ते सर्व वैभव एकेकाळी भारतात होते. गेल्या दहा-बारा वर्षांत हे वैभव काळवंडले आहे. मोदींचे तथाकथित स्थिर सरकार लाचखोरी, आमदार-खासदारांची खरेदी-विक्री अशा पायांवर उभे आहे. भाजपला 2024 साली बहुमत मिळाले नाही. त्यांचा स्वतःचा आकडा 240 होता व कुबड्या पकडून तो 292 झाला. आता त्यांचा आकडा 325 वर पोहोचला. कोणत्याही निवडणुकीशिवाय हा आकडा फुगला कसा? ते त्यांनी लाल किल्ल्यावरून सांगायला हवे होते. सक्षम न्याय व्यवस्था व राज्य घटनेस ‘पंगू’ करून, या दोन्ही संस्थांत दहशत निर्माण करून पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून स्थिर सरकार असल्याची थापेबाजी केली, तीसुद्धा भारतीय तिरंग्याच्या साक्षीने. मोदी स्वातंत्र्य दिनी परंपरेप्रमाणे देशाशी व जनतेशी खोटे बोलले. त्यांच्या राजवटीत देशाची शिक्षण व्यवस्था, अर्थ व्यवस्था, निवडणूक आयोग, न्याय व्यवस्था यासारख्या संस्थांचे पूर्ण अधःपतन झाले आहे. जंतर मंतरवर तरुणांच्या असंतोषाचा उद्रेक झाला तेव्हा मोदींचे धाबे दणाणले. ते गायब झाले ते थेट लाल किल्ल्यावर प्रकटले. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात थापांच्या तोफा उडवून त्यांनी बारा वर्षांची परंपरा कायम राखली. अर्थात या तोफा लवकरच थंडावतील, असे देशातले वातावरण आहे.






























































