यूजीसी-नेटच्या तीन विषयांची परीक्षा रद्द, पुन्हा नामुष्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता (यूजीसी-नेट) चाचणीच्या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) आज केली. ‘नीट’नंतर एनटीएवर यंदाच्या वर्षात दुसऱयांदा अशी नामुष्की ओढवली.

सहाय्यक प्राध्यापक आणि पीएचडी अभ्यासक्रमांमधील प्रवेशासाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यासाठी यूजीसी-नेट ही परीक्षा घेतली जाते. 22 ते 30 जूनदरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र या परीक्षेतील इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. त्याबाबतच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे समितीला आढळले. त्यानंतर तीनही विषयांची परीक्षा पुन्हा घेतली जावी, अशी शिफारस समितीने केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. a

कधी होणार परीक्षा?

नव्या वेळापत्रकानुसार रद्द झालेल्या विषयांची फेरपरीक्षा 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. इंग्रजीचा पेपर 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळेत होईल. त्यानंतर 3 ते 6 या वेळेत वाणिज्य विषयाचा पेपर होईल तर समाजशास्त्राचा पेपर 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळेत होणार आहे.