
छत्तीसगडमधील रायपूर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसी मित्राच्या गाडीत दिसल्यानंतर तिला थांबवण्यासाठी प्रियकर गाडीच्या बोनेटवर चढला. मात्र गाडी थांबली नाही. गाडी 200 मीटर पुढे गेल्यानंतर तरूण बोनेटवरून पडला आणि गाडी त्याच्या अंगावरून गेली. यात तरुणाचा मृत्यू झाला. परमप्रीत सिंग असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, परमप्रीत आणि सदर तरूणीचे गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांच्या घरी लग्नाची बोलणी सुरू होती. परमप्रीत व्यावसायिक होता. परमप्रीतने आपल्या गर्लफ्रेंडला त्याचा मित्र भरत मंगानीसोबत पाहिले. यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला. सुरुवातीला त्या दोघांमध्ये परमप्रीतच्या गाडीत बाचाबाची झाली.
यानंतर ती मुलगी भरतसोबत निघू लागली. परमप्रीतने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती इतकी चिघळली की परमप्रीतने भरतच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर भरतने गाडी पुढे नेली, पण मागे हटण्याऐवजी परमप्रीत गाडीच्या बोनेटवर चढला. तरीही भरतने गाडी पुढे नेली.
पोलिसांच्या माहितीनुसार, 200 मीटर पुढे गेल्यानंतर परमप्रीत बोनेटवरून रस्त्यावर पडला. परमप्रीत पडल्यानंतर गाडी त्याच्या अंगावरून गेली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. अमनका पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
























































