छात्रों की गूंज आता पुण्यात! २२ ऑगस्ट रोजी राहुल गांधी साधणार विद्यार्थिनींशी संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी एका मोठ्या कार्यक्रमाची घोषणा केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसतर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ या देशव्यापी मोहिमेचा पुढील टप्पा २२ ऑगस्ट रोजी पुण्यात पार पडणार आहे. विशेष म्हणजे, पुण्यात होणारा हा कार्यक्रम केवळ विद्यार्थिनींसाठी असणार आहे, अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली.

राहुल गांधी यांनी एक्स (X) वर पोस्ट करत या कार्यक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, “२२ ऑगस्ट रोजी ‘छात्रों की गूंज’ पुण्यात येत आहे आणि यावेळी हा कार्यक्रम पूर्णपणे मुलींसाठी असेल. आता मुली बोलतील आणि संपूर्ण देश ऐकेल.” यावेळी त्यांनी मुलींना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहनही केले आहे.

पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात मुलींना येणाऱ्या अडचणी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राहुल गांधी त्यांच्याशी या मंचावरून संवाद साधणार आहेत.