बिहार बनली पेपर लीकची राजधानी, तेजस्वी यादव यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी रविवारी राज्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, तसेच सातत्याने उघडकीस येणाऱ्या पेपरफुटीच्या प्रकरणांवरून एनडीए (NDA) सरकारवर सडकून टीका केली आहे. “बिहार आता ‘पेपर लीक’ची राजधानी बनली आहे,” असा घणाघात त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महागठबंधनच्या वतीने १९ ऑगस्ट रोजी पाटणा येथील राजभवनवर भव्य मोर्चा काढण्याची घोषणाही यादव यांनी केली आहे.

पत्रकारांशी बोलताना तेजस्वी यादव यांनी राज्य सरकारवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले की, बिहारमध्ये १०वी आणि १२वी च्या परीक्षांपासून ते स्पर्धा परीक्षांपर्यंत सर्वत्र मोठ्या प्रमाणात पेपर फुटी आणि गैरप्रकार होत आहेत. यामुळे पारदर्शक पद्धतीने निवड प्रक्रिया होणे अशक्य झाले आहे. या गैरप्रकारांच्या विरोधात जेव्हा विद्यार्थी आणि युवक रस्त्यावर उतरून आवाज उठवतात, तेव्हा सरकार त्यांची मुस्कटदाबी करते. सिवानमध्ये नुकत्याच झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून चक्क AK-47 रायफलचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप यादव यांनी केला आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून, सरकारला जाब विचारण्यासाठी १९ ऑगस्ट रोजी राजभवनवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विद्यार्थी, शिक्षक, कोचिंग संस्थांचे प्रतिनिधी आणि युवक सहभागी होणार आहेत. सिवानमधील गोळीबाराच्या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी राज्यपालांना निवेदन देण्यात येणार आहे. केवळ एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून हा प्रश्न सुटणार नाही, तर विद्यार्थ्यांवर गोळीबाराचे आदेश देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही तातडीने कारवाई व्हायला हवी, अशी मागणी तेजस्वी यांनी केली.