
जर्मनीच्या म्युनिक विमानतळावर व्हिएतनाम एअरलाईन्सच्या विमानाचे तत्काळ लँडिंग करण्यात आल्याने एक मोठी दुर्घटना टळली आहे. हनोईच्या दिशेने उड्डाण करणाऱ्या बोईंग 787 या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाने पुन्हा म्युनिक विमानतळाकडे वळवण्यात आले.
‘Flightradar24’ या लाईव्ह फ्लाईट ट्रॅकिंग संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, टेकऑफच्या वेळी विमानातील तांत्रिक बिघाडामुळे धावपट्टीवरून पुढे निघून जाण्याचा धोका निर्माण झाला होता. विमानाचे वजन कमी करण्यासाठी आणि इंधन हलके करण्यासाठी या विमानाला हवेत दोन तासांहून अधिक काळ फेऱ्या माराव्या लागल्या. त्यानंतर वैमानिकाने अत्यंत कौशल्याने म्युनिक विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग घडवून आणले.
लँडिंगनंतर खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने धावपट्टीवर दाखल झाल्या. आपत्कालीन स्लाईड्सचा वापर करून सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. एअरलाइनने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात तांत्रिक बिघाडामुळे विमान परत उतरवण्यात आल्याची पुष्टी केली आहे, मात्र बिघाडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. विमान कर्मचाऱ्यांनी सर्व सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करून लँडिंग केले असून, सर्व प्रवासी व केबिन क्रू पूर्णपणे सुरक्षित आहेत.
या घटनेच्या सखोल तपासासाठी एअरलाइन संबंधित प्रशासकीय यंत्रणांसोबत काम करत आहे. दरम्यान, दक्षिण धावपट्टीवरून उड्डाण केले होते; मात्र त्याचे लँडिंग उत्तर धावपट्टीवर करण्यात आले. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ प्रशासनाने उत्तरेकडील धावपट्टी तात्पुरती बंद केली असून, त्यामुळे काही उड्डाणांना विलंब होण्याची शक्यता वर्तवली आहे.



























































