
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केलेल्या ‘दिमागी नक्षल’ या वक्तव्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी रविवारी पंतप्रधान मोदींना जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. “मला दिमागी नक्षल असल्याचा अभिमान आहे,” अशी खोचक प्रतिक्रिया चिदंबरम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना ‘दिमागी नक्षल’ मानसिकता असलेल्या लोकांना ओळखून त्यांना वेगळे करण्याचे आवाहन नागरिक आणि अधिकाऱ्यांना केले होते. या वक्तव्यावरून आता काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मोदींनी काय म्हटले होते?
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी 2014 पासून सरकारने केलेल्या कारवाईमुळे जंगलांमध्ये सुरू असलेला सशस्त्र नक्षलवाद मोठ्या प्रमाणात संपुष्टात आल्याचे म्हटले. या संघर्षात 3,500 हून अधिक सुरक्षा जवानांचा मृत्यू झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
मात्र, माओवादी विचारसरणी असलेली ‘दिमागी नक्षल’ मानसिकता अजूनही अस्तित्वात असल्याचा दावा मोदी यांनी केला. अशा विचारसरणीचे लोक पूर्वी सरकारी समित्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर होते आणि धोरणांवर प्रभाव टाकत होते, असा आरोपही त्यांनी केला.
हत्यारबंद माओवादी हिंसाचाराचा शेवट जवळ आला असला तरी काही संस्थांमध्ये वैचारिक नक्षलवादी मानसिकता अद्याप असल्याचे मोदी म्हणाले. तरुणांना राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेशी जोडून ठेवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
I am proud to be a dimagi naxal !
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) August 16, 2026
काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर शनिवारीच काँग्रेसने टीका केली होती. काँग्रेसने ‘दिमागी नक्षल’विरोधातील मोदींच्या इशाऱ्याला केवळ राजकीय शेरेबाजी असल्याचे म्हटले.
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, काही वर्षांपूर्वी सरकारकडून राजकीय विरोधकांसाठी ‘अर्बन नक्षल’ हा शब्द वापरला जात होता. त्यावेळी ‘अर्बन नक्षल’ची अधिकृत कायदेशीर व्याख्या काय आहे, असा प्रश्न संसदेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत ‘अर्बन नक्षल’ अशी कोणतीही अधिकृत संकल्पना किंवा कायदेशीर व्याख्या नसल्याचे स्पष्ट केले होते, असे रमेश यांनी सांगितले.
“दोन-तीन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांना ‘अर्बन नक्षल’ म्हटले होते. त्यावेळी संसदेत ‘अर्बन नक्षल’ची व्याख्या काय आहे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. गृहमंत्र्यांनी ‘अर्बन नक्षल’ अशी कोणतीही गोष्ट किंवा त्याची कोणतीही व्याख्या नसल्याचे सांगितले होते. आता पंतप्रधान लाल किल्ल्यावरून आपल्या राजकीय विरोधकांसाठी ‘दिमागी नक्षल’ हा शब्द वापरत आहेत,” असे जयराम रमेश यांनी म्हटले.























































