
वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला जाणाऱ्या एका प्रवाशाजवळील बंदुकीची तपासणी सुरू असताना अचानक गोळी झाडली गेली. या अपघातात विमानतळावरील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेशातील आझमगड येथील एक नागरिक आपल्या पत्नीसोबत वाराणसीवरून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमाक IX-1810 या विमानाने प्रवास करणार होता. या प्रवाशाकडे एक पिस्तूल आणि मॅगझिन होते. नियमानुसार, त्याने बोर्डिंग करण्यापूर्वी आपल्याकडे परवानाधारक शस्त्र असल्याचे विमानतळ प्राधिकरणाला जाहीर केले होते.
सकाळी सुमारे 9.30 वाजता विमानतळ परिसरामध्ये या शस्त्राची आणि त्याच्या कागदपत्रांची अधिकृत तपासणी सुरू होती. त्यावेळी बंदुकीचा मालक आणि विमानतळाचे सुरक्षा कर्मचारी दोघेही तेथे उपस्थित होते. तपासणीदरम्यान अचानक बंदुकीतून गोळी सुटली. बंदुकीतून सुटलेली गोळी प्रथम खाली जमिनीवर आदळली आणि तिथून उडून जवळच उभ्या असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना लागली, अशी माहिती वाराणसी विमानतळाचे संचालक पुनीत गुप्ता यांनी दिली.
बंदुकीतून सुटलेली गोळी महिला कर्मचाऱ्याच्या मांडीला आणि पुरुष कर्मचाऱ्याच्या हाताळा घासून गेली. यात दोघेही जखमी झाले आहेत. जखमी झालेले दोन्ही कर्मचारी ‘AAICLAS’ (Airports Authority of India Cargo Logistics and Allied Services) या संस्थेचे सुरक्षा तपासणी करणारे आहेत. घटनेनंतर तत्काळ दोन्ही जखमी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदतीसाठी जवळील न्यू लक्ष्मी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. दोन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Today, 16.08.2026, at about 0930 hrs, a passenger travelling with his wife on flight IX-1810 to Mumbai declared weapons on board the flight. During the weapons check, the passenger fired a round, injuring two AAICLAS screeners. Both were taken to New Laxmi Trauma Centre for…
— ANI (@ANI) August 16, 2026
दरम्यान, या घटनेची माहिती तातडीने स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला का किंवा बंदुकीमध्ये काही तांत्रिक बिघाड होता, या दृष्टीने पोलीस आणि विमानतळ प्रशासनाकडून सविस्तर तपास सुरू आहे.























































