रामराज्याची भाषा करणाऱ्यांनीच रामधन लुटले, अखिलेश यादव यांची भाजपवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. धार्मिक स्थळांवरील देणगी चोरी, E20 पेट्रोलमधील भेसळ, बेरोजगारी आणि जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला कोंडीत पकडले. “ज्यांनी रामराज्याची भाषा केली, त्यांनीच रामधन लुटले,” असा घणाघात यादव यांनी केला आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

अयोध्येतील राममंदिरात उघडकीस आलेल्या देणगी चोरीच्या प्रकरणावरून अखिलेश यादव यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, भाजपने नेहमीच रामराज्याची मोठी आश्वासने दिली, पण प्रत्यक्षात त्यांनी रामधन देखील सोडले नाही. या चोरीमध्ये मोठे आणि प्रभावशाली लोक सामील असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी केवळ खालच्या स्तरावरील छोट्या कर्मचाऱ्यांना अटक करून तुरुंगात पाठवले जात असल्याचेही यादव यांनी म्हटले आहे.

जातनिहाय जनगणना आणि बेरोजगारी

अखिलेश यादव यांनी जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्याला पुन्हा एकदा उचलून धरले. देशातील वाढती बेरोजगारी आणि तरुणांच्या भविष्याबाबत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप त्यांनी केला. आरक्षण हिरावून घेण्याचा आणि तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्याचा डाव रचला जात असल्याचेही ते म्हणाले.

अखिलेश यादव यांनी E20 पेट्रोलच्या वितरणाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, यामध्ये एक मोठा खेळ सुरू असल्याचा संशय व्यक्त केला. याशिवाय उत्तर प्रदेशातील पोलीस व्यवस्था आणि कायदा व सुव्यवस्थेवर टीका करताना ते म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात जनतेला जितका अन्याय, अपमान आणि फसवणूक सहन करावी लागली आहे, तितकी यापूर्वी कधीही झाली नव्हती.