
बिजिंगहून युकेला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचे रशियात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात 230 हून अधिक प्रवासी होते. सर्व सुखरुप आहेत. एअरलाईन्स कंपनीने घटनेला दुजोरा दिला असून प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगितले.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हैनान एअरलाइन्सचे विमान HU753 बीजिंगहून मँचेस्टर विमानतळाच्या दिशेने निघाले होते. उड्डाणानंतर चार तासांनी हवेतच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. वैमानिकाने आपत्कालीन संकेत जारी करत विमान रशियाच्या क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवले.
खबरदारीचा उपाय म्हणून रशियन आपत्कालीन पथके विमानतळाच्या धावपट्टीवर तैनात करण्यात आली होती. स्थानिक वेळेनुसार सकाळी 6.28 वाजता विमान क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.

























































