अवघ्या ३८ मिनिटांत दोन रॉकेट लॉन्च, स्पेसएक्सने रचला नवा इतिहास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेची अंतराळ संशोधन कंपनी स्पेसएक्सने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अमेरिकेच्या दोन वेगवेगळ्या किनाऱ्यांवरून अवघ्या ३८.५ मिनिटांच्या अंतराने दोन फाल्कन ९ रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च करून स्पेसएक्सने नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या लॉन्चमुळे कंपनीने ऑगस्ट २०२४ मध्ये प्रस्थापित केलेला आपलाच ६५ मिनिटांचा आधीचा विक्रम मोडीत काढला आहे.

पहिली मोहीम फ्लोरिडाच्या केप कॅनव्हरल स्पेस फोर्स स्टेशनवरून रात्री ९ वाजून १२ मिनिटांनी पार पडली. या फाल्कन ९ रॉकेटने सॅटेलाइट कम्युनिकेशन कंपनी ग्लोबलस्टारचे आठ लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट्स अवकाशात नेले. लॉन्च झाल्यानंतर सुमारे ५६ मिनिटांनी हे सॅटेलाइट्स यशस्वीरित्या त्यांच्या कक्षेत स्थापित करण्यात आले.

यानंतर अवघ्या ३८.५ मिनिटांनी, म्हणजेच रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी, अमेरिकेच्या दुसऱ्या टोकावरून म्हणजेच कॅलिफोर्नियातील ‘व्हँडेनबर्ग स्पेस फोर्स बेस’वरून दुसरे फाल्कन ९ रॉकेट लॉन्च करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत ‘यूएस स्पेस फोर्स’साठी USSF-366 नावाचा एक अत्यंत गुप्त पेलोड अवकाशात पाठवण्यात आला.