एअर इंडिया इमारतीवर झळकणार 106 हुतात्म्यांची नावे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे चिरंतन स्मरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे चिरंतन स्मरण व्हावे यासाठी राज्य सरकारने ताब्यात घेतलेल्या एअर इंडियाच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागात या सर्व हुतात्म्यांची नावे ठळकपणे आणि सन्मानपूर्वक लावली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मुख्य सचिवांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱया हुतात्म्यांची नावे या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात ठळक अक्षरांत कायमस्वरूपी कोरावीत, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशीष शेलार यांनी केली होती. ‘संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या ऐतिहासिक आंदोलनात 106 आंदोलकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळे महाराष्ट्राची निर्मिती झाली असून या हुतात्म्यांचे योगदान महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या स्मृती चिरंतन राहायला हव्यात. त्यासाठी आवश्यक असल्यास सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून संबंधित विभागाला योग्य ते सहकार्य करण्यात येईल, असे शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते. फडणवीसांनी शेलार यांच्या मागणीची दखल घेत मुख्य सचिवांना याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • एअर इंडियाच्या नव्या इमारतीचे सध्या नूतनीकरण सुरू असून, लवकरच या इमारतीत प्रशासकीय कामकाज सुरू होणार आहे. ही इमारत महाराष्ट्र सरकारच्या प्रशासकीय कामकाजाचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.