
पंडित नेहरूंसह गांधी परिवाराची अंशभरही सभ्यता सध्याच्या राज्यकर्त्यांकडे नाही. सत्तेचा माज असा भिनला आहे की, हे सगळे लोक बेफाम आणि बेधुंद बनले आहेत. प. बंगालात, महाराष्ट्रात, आसाम, उत्तर प्रदेशात या बेफाम वृत्तीने टोक गाठले आहे. उत्तर प्रदेशात गुंड प्रवृत्तीच्या लोकांना विनाचौकशी गोळ्या घातल्या जातात तर प. बंगालात अशा गुंडांना सरकार ‘संतप्त नागरिक’ असल्याचे सांगून पाठबळ देत आहे. मणिपुरातली हिंसा रोखण्याची हिंमत मोदी-शहांमध्ये नाही. तेथे कायद्याचे धिंडवडे चार वर्षांपासून निघत आहेत. आता प. बंगालात तेच चित्र आहे. मोदी-शहांचे व कायदा सुव्यवस्थेचे वाकडे आहे. प. बंगालात कायदा भाडोत्री गुंडांच्या हातात देऊन सरकार आगीशी खेळत आहे. या आगीने वणव्याचे स्वरूप घेतले तर मोदी-शहांचा बालही शिल्लक राहणार नाही!
ममता बॅनर्जी यांच्यावर प. बंगालात निर्घृण आणि भ्याड हल्ला झाला आहे. दंगलखोरांनी ममतांची गाडी अडवली व दगड, लाठ्या, लोखंडी शिगांनी हल्ला केला. त्यांना बहुधा ममता बॅनर्जी यांना कायमचेच संपवायचे होते, पण मां कालीच्या कृपेने ममता दीदी बचावल्या आहेत. प. बंगालातील सत्ता गमावल्यापासून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर, आमदारांवर, खासदारांवर असे हल्ले सुरू झाले आहेत. खुद्द अभिषेक बॅनर्जी यांच्यावरही हल्ला झाला. खासदार कल्याण बॅनर्जींवर हल्ला झाला. एका बाजूला तृणमूल काँग्रेसमधून बेइमानी करणाऱ्या 22 खासदारांना पंतप्रधान मोदी आपल्या निवासस्थानी ‘पार्टी’ करायला बोलवत आहेत. त्यांच्याशी हास्यविनोद करताना ते छायाचित्रात दिसत आहेत. त्याच वेळी ज्या महिलेने या सगळ्यांना खासदार बनवले त्या महिलेवर मोदी सरकारचे गुंड खुनी हल्ला करत आहेत. ममतांचे राज्य हे कायद्याचे राज्य नाही, असे प. बंगालात येऊन मोदी-शहा सांगत होते. मग आता जे राज्य प. बंगालात लादले आहे ते कायद्याचे राज्य आहे असे म्हणता येईल काय? प. बंगालात स्वातंत्र्यापूर्वीसुद्धा हिंसा आणि दंगलीच झाल्या व आताही तेच चित्र आहे. ममता बॅनर्जींवरील निर्घृण हल्ला ही मोदी-शहा व प. बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचीच मेहरबानी आहे. विधानसभा निवडणूक काळात ममता बॅनर्जी यांचे लोक हिंसाचार करतील, लोकांना मतदान करू देणार नाहीत या सबबीखाली साडेतीन लाखांचे अर्धसैनिक बल केंद्र सरकारने प. बंगालात उतरवले होते. मग आता जो हिंसाचार सुरू आहे तो रोखण्यासाठी मोदी-शहांनी लाखभर अर्धसैनिक बल तरी पाठवावे. प. बंगालात माजी मुख्यमंत्री, खासदार, आमदारांवर हल्ले होणे हे चांगल्या राज्यव्यवस्थेचे लक्षण नाही. पुन्हा भाजपचे तेथील प्रदेशाध्यक्ष सांगतात, ‘‘या हिंसेशी, ममतांवरील हल्ल्याशी भाजपचा
दुरान्वयेही संबंध
नाही. ही तृणमूल आणि जनतेची लढाई आहे. तृणमूलने जे केले तेच आता त्यांच्यावर उलटले आहे.’’ भाजप प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांचे हे विधान धक्कादायक आणि सूडबुद्धीचे आहे. त्यांच्या मते, ममतांवरील हल्ला ही जनता व तृणमूलमधील लढाई असेल तर ती रोखणे ही सरकार म्हणून त्यांची जबाबदारी नाही काय? याचा अर्थ स्पष्ट आहे की, भाड्याच्या गुंड टोळ्यांना सरकार प्रोत्साहन देत आहे. हे एक प्रकारे अराजक आहे. समिक भट्टाचार्य यांचे म्हणणे शब्दशः स्वीकारले तर मग ‘जंतर मंतर’वरची लढाई ही देशातील युवक विरुद्ध पंतप्रधान मोदींची आहे, असेच म्हणावे लागेल. मोदी यांच्याविरुद्ध लोकांच्या मनात कमालीचा संताप आहे. तो ‘जंतर मंतर’च्या आंदोलनात लाव्हासारखा उफाळून आलेला दिसला, पण या तरुण मुलांना भाजपने गुंड आणि देशद्रोही ठरवले, पण प. बंगालात ममतांवर हल्ला करणारी मात्र भाबडी जनता आहे असे भाजप सांगतोय. मोदी-शहांनी प. बंगालची विधानसभा निवडणूक सरळ मार्गाने जिंकली नसून ही निवडणूक चोरली आहे. पराभवानंतरही ममता रस्त्यावरची लढाई लढत आहेत व लोकांचे समर्थन त्यांना मिळते आहे हे पाहिल्यावर त्यांना ठार मारण्याचा डाव रचला आहे. एका बाजूला मोदींचे सरकार बांगलादेशच्या पदभ्रष्ट पंतप्रधान शेख हसीना यांचे संरक्षण करताना दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला प. बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममतांवर खुनी हल्ले सुरू केले आहेत. विरोधकांना जीवे मारायचे धोरण हे सैतानी राज्यातच घडू शकते ते चित्र भारतात दिसत आहे. लोकशाहीत जय-पराजय होत असतात म्हणून आधीच्या राज्यकर्त्यांवर असे हल्ले घडवून आणणे व त्या हल्ल्याचे समर्थन करणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे. अर्थात, मोदी-शहांनी भारतीय राजकारणात विकृतीस संस्कृतीचे स्वरूप देऊन
देशाला बरबाद
केले. ‘जंतर मंतर’वर त्यांच्या पोलिसांनी विद्यार्थ्यांवर पॅलेट गन्स चालवल्या. झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनात नेहा बोरावर शाई फेकून हल्ला केला. अभिजीत दीपकेला धमक्या दिल्या जात आहेत. इंग्रजांच्या किंवा औरंगजेबाच्या जुलमी राजवटीस लाजवणारी ही कृत्ये आहेत. प. बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांवर हल्ले होतात, पण देशाच्या पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडून साधी संवेदना व्यक्त होत नाही. प. बंगालचे मुख्यमंत्री अशा हिंसेचा निषेध करत नाहीत. अशा राजवटीस काय म्हणावे? जणू लोकशाहीचे कलेवर पडले आहे व मोदी-शहा त्यावर बसून जिलेबी खात आहेत. लोकशाहीत विरोधी पक्षाचे स्थान महत्त्वाचे असते, पण विरोधकांना शिल्लक ठेवायचे नाही. त्यांना ‘फोडा, विकत घ्या किंवा ठार मारा’ ही मोदी-शहांची राष्ट्रीय भूमिका स्पष्ट दिसते. मोदी-शहांनी जागोजागी, राज्याराज्यांत गुंडांच्या हाती सत्तेची सूत्रे दिली व त्यांना हवा तसा हैदोस घालण्याची मोकळीक दिली. हिंदुत्व आणि संस्कृतीवर फक्त प्रवचने झोडायची. मात्र कृतीच्या बाबतीत उपड्या घड्यावर पाणी. पंडित नेहरूंसह गांधी परिवाराची अंशभरही सभ्यता सध्याच्या राज्यकर्त्यांकडे नाही. सत्तेचा माज असा भिनला आहे की, हे सगळे लोक बेफाम आणि बेधुंद बनले आहेत. जणू काही सत्तेचा अमरपट्टाच घेऊन हे लोक जन्माला आले आहेत. प. बंगालात, महाराष्ट्रात, आसाम, उत्तर प्रदेशात या बेफाम वृत्तीने टोक गाठले आहे. उत्तर प्रदेशात गुंड प्रवृत्तीच्या लोकांना विनाचौकशी गोळ्या घातल्या जातात तर प. बंगालात अशा गुंडांना सरकार ‘संतप्त नागरिक’ असल्याचे सांगून पाठबळ देत आहे. मणिपुरातली हिंसा रोखण्याची हिंमत मोदी-शहांमध्ये नाही. तेथे कायद्याचे धिंडवडे चार वर्षांपासून निघत आहेत. आता प. बंगालात तेच चित्र आहे. मोदी-शहांचे व कायदा सुव्यवस्थेचे वाकडे आहे. प. बंगालात कायदा भाडोत्री गुंडांच्या हातात देऊन सरकार आगीशी खेळत आहे. या आगीने वणव्याचे स्वरूप घेतले तर मोदी-शहांचा बालही शिल्लक राहणार नाही!

































































