
>>अरुण<<
इटलीमध्ये व्हेनिस हे ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध शहर. कालव्यांची नगरी म्हणून ते इतकं विख्यात झालं की त्याभोवती युरोपीय साहित्यात अनेक कथा रचल्या गेल्या. ‘मर्चन्ट ऑफ व्हेनिस’ ही अशीच एक जागतिक कीर्ती पावलेली गोष्ट. याशिवाय व्हेनिसचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तिथले पट्टय़ांचे पडदे. एकेकाळी बांबूच्या पट्टय़ा (कामटय़ांचे) जाड दोरीने परस्परात गुंफलेले आणि दोन्ही बाजूला अडकवल्यावर पांचा वापर करून कामटय़ा किंवा पट्टय़ा किंवा ‘ब्लाइन्डस्’ खाली-वर करता येणारे पडदे ही व्हेनिसची एक खासियत. परंतु या पडद्यांचा उगम झाला तो पर्शिया किंवा आजच्या इराणमध्ये. इटालियन व्यापाऱ्यांनी ते पाहून युरोपात नेले आणि तिथे ते ‘व्हेनिशियन ब्लाइन्ड’ म्हणून प्रसिद्ध झाले. वास्तविक ‘ब्लाइन्ड’ हा शब्द काळोख अशा अर्थाने आलेला आहे. पट्टय़ांचे काळोख करणारे पडदे म्हणजे ब्लाइन्डस्. त्यापैकी व्हेनिशियन ब्लाइन्डचं वैशिष्टय़ असं की पात अडकवलेली जाड दोरी ओढली की या पट्टय़ा सरळ, तिरक्या किंवा एकदम बंद होतात. याचा फायदा असा की त्यातून हवा तेवढा उजेड घेता येतो. पट्टय़ा तिरप्या असताना आतून बाहेर पाहता आलं तरी बाहेरून घरात सहज पाहता येत नाही.
कामटय़ा, प्लॅस्टिक किंवा अॅल्युमिनियमच्या पट्टय़ा खिडकीच्या मापानुसार बसवून मिळतात. एरवी पडदे एका बाजूला सारावे लागतात, पण पट्टय़ांचे पडदे उघडबंद करता येतात. याशिवाय रोलर आणि रोमन ‘ब्लाइन्डस्’सुद्धा असतात. या दोन्ही प्रकारचे पडदे वरच्या बाजूला गुंडाळता येतात. (रोल होतात)
आपल्याला इन्टरेस्ट आहे तो या प्रकारच्या पडद्यांची सुरुवात कशी झाली ते जाणून घेण्यात. 1700 मध्ये युरोपात असे उभ्या पट्टय़ांचे (व्हर्टिकल ब्लाइन्डस्) पडदे आले. जगात प्रसिद्ध ठरले ते व्हेनिसच्याच नावाने. याशिवाय व्हेनिसच्या आकर्षित करणाऱ्या गोष्टी म्हणजे व्हेनिसन कालवे.
या शहरात तब्बल 150 ते 177 कालवे असून सारा व्यवसाय, व्यापार बोटीतून चालतो. व्हेनिसची जनता त्या कालव्यांकाठीच राहते. आपल्या घराबाहेर फूटपाथ असतो तसा तिथे कालवा. चालणाऱ्यांसाठी या कालव्यांवर सुमारे 400 पदपूल आहेत. इथले बहुसंख्य नागरिक कालव्यांकाठी राहण्याची सुरुवात सुमारे पंधराव्या शतकात झाली. तेव्हापासून व्हेनिशियन लोक या कालव्यांच्या दुतर्फा असलेल्या गॉथिक प्रकारच्या दगडी बांधकामाच्या घरांमध्ये राहतायत. मात्र या जलसान्निध्याने संपूर्ण व्हेनिस खचत चाललंय त्याचं काय?
























































