
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबले असतानाच इराणसमर्थित हुती बंडखोरांनी अचानक सौदी अरेबिया आणि येमेनमध्ये मोठे हल्ले केले. त्यात येमेनमधील ५८ सैनिकांचा मृत्यू झाला, तर सौदी अरेबियामध्ये ११ नागरिक जखमी झाले आहेत. त्यामुळे शांत झालेले युद्ध पुन्हा भडकण्याची भीती निर्माण झाली आहे.
हुती बंडखोरांनी सर्वप्रथम येमेनच्या लष्करी तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोनने हल्ला केला. तर दुसरा हल्ला सौदी अरेबियाच्या नजरान भागात झाला. त्यात सौदीचे ७, येमेन व पाकिस्तानचा प्रत्येकी १ आणि इजिप्तच्या २ नागरिकांसह ११ जण जखमी झाले. जखमींमध्ये एका चार वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे. हुतीच्या हल्ल्यानंतर नजरानमध्ये अनेक ठिकाणी आग लागली. “या हल्ल्याचे योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी उत्तर दिले जाईल,” असा इशारा येमेनच्या संरक्षण मंत्रालयाने दिला आहे. हुती बंडखोरांच्या या मोठ्या हल्ल्यानंतर येमेनमध्ये गृहयुद्ध भडकण्याचा धोका निर्माण झाला आहे.
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून वसूल करणार कर
इराण आणि अमेरिकेने वाटाघाटी सुरू करण्यास सहमती दर्शविल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सध्या मालवाहू जहाजांची वाहतूक सुरू झाली आहे. इराण आणि अमेरिकामध्ये होर्मुझसंदर्भात लवकरच करार होण्याची शक्यता आहे. यासाठी ओमान मध्यस्थी करत आहे. ओमानच्या माध्यमातून अमेरिकेकडून प्रस्ताव पाठवला जात आहे. होर्मुझमधून जाणाऱ्या मालवाहू जहाजांकडून ७ टक्के कर आकारण्याचा प्रस्ताव असून, त्यापैकी ७५ टक्के वाटा इराणला, तर २५ टक्के वाटा ओमानला मिळेल.

























































