
श्रीलंकेच्या ज्युनियर संघाने टीम इंडियाचे पहिल्याच दिवशी वस्त्रहरण केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे प्रशिक्षक गौतम गंभीर यांची रणनीती पहिल्या दिवशी तरी संपूर्ण अपयशी ठरल्याचेच पाहायला मिळाले. या ज्युनियर संघाने शतक ओलांडले तरी टीम इंडियाला एकही बळी (विकेट) मिळवता आला नव्हता. त्यामुळे दिवसअखेर त्यांनी ३६३ धावांचा पल्ला गाठला आणि टीम इंडियाच्या गोलंदाजांवर नामुष्की ओढवली. संघाच्या फिरकीपटूंनी अखेरच्या काही षटकांमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत श्रीलंकेचा ज्युनियर संघ ३०० धावांच्या पुढे निघून गेला होता.
वेगवान गोलंदाज निकामी
टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज या सामन्यात पूर्णपणे निकामी ठरल्याचे पाहायला मिळाले. मोहम्मद सिराजने १३ षटकांमध्ये ४४ धावा दिल्या, पण त्याला एकही बळी मिळवता आला नाही. प्रसिद्ध कृष्णाची गोलंदाजी तर ८ षटकांनंतर बंदच करण्यात आली. या ८ षटकांत त्याने ३२ धावा दिल्या आणि तोदेखील बळी मिळवण्यापासून परावृत्त राहिला.
पहिल्या बळीसाठी शतकी भागीदारी
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रीलंका इलेव्हनच्या निशन मदुष्का आणि रविंदू रसंथा यांच्या जोडीने स्फोटक सुरुवात केली. या जोडीने २०.४ षटकांत पहिल्या बळीसाठी ११० धावा जोडल्या. निशनने ६५ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि एका षटकारासह ६६ धावा केल्या. तो धावबाद झाला. पहिल्या सत्रात टीम इंडियाला केवळ एकच बळी मिळाला. रविंदूनेही अर्धशतक झळकवले. रवींद्र जाडेजाने पसिंदू सुरियाबंदाराला (३५) बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. पवन रत्नायकेने ३९ धावा आणि अहान विक्रमसिंघेने ३१ धावा केल्या. धावसंख्या २५० पर्यंत पोहोचल्यावर दोघेही पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर कर्णधार सोनल दिनुशा खेळपट्टीवर स्थिरावला. त्याने यष्टिरक्षक अंजला बंदारासोबत ३४ धावा आणि रमेश मेंडिससोबत ६४ धावांची भागीदारी केली. रवींद्र जाडेजाने नव्या चेंडूने मेंडिसला बाद करून श्रीलंकेची भागीदारी मोडीत काढली. मेंडिसने ४९ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या.
सोनलनेही अर्धशतक झळकवले…
मानव सुथारने कर्णधार सोनलचा बळी घेतला. त्याने आपल्या ७१ चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि एका षटकारासह ५२ धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा केशरा नुवान्था नऊ धावांवर, तर दिलुम सुदिरा एका धावेवर खेळत होते. भारताकडून रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर गुरनूर ब्रारने एक बळी घेतला.
गिलला दुखापत, राहुल कर्णधार
मानेच्या दुखापतीमुळे शुभमन गिल या सराव सामन्यात खेळू शकला नाही. गिलच्या जागी के. एल. राहुल या सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. गिल या दुखापतीमधून कधी सावरतो याकडे सर्वांचे लक्ष आहे, कारण टीम इंडियाचा पहिला कसोटी सामना काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
संक्षिप्त धावफलक: श्रीलंका इलेव्हन: ९० षटकांत ८ बाद ३६३ (रवींदू रसांथा ७१, निशन फर्नांडो ६६, सोनल दिनूशा ५२; मानव सुथार २/३३, रवींद्र जाडेजा २/६४) वि. हिंदुस्थान.

























































