रंग-रेषा – अमूर्तानुभवी चित्रकार, कवी, लेखक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< अरविंद हाटे
[email protected]

संवेदनशील चित्रकार, लेखक, कवी अशा प्रत्येक शैलीतून स्वतःची छटा उमटवणारे प्रभाकर कोलते यांनी नुकतेच 80 व्या वर्षात पदार्पण केले. अमूर्त भाषेतून चित्रसंवाद साधणारी त्यांची चित्रे मुंबईतील केमोल्ड प्रिस्कॉट रोड या कलादालनात 29 ऑगस्टपर्यंत पाहता येतील. त्यानिमित्त बहुअर्थी दृश्यभाषा घडविणाऱ्या या कलाकाराविषयी…

एखाद्या व्यक्तीला अवकाशाचे वर्णन करायला सांगितले तर ती व्यक्ती गर्द विचारांच्या वनराईत हरवून जाते. मग त्यात अनेक आकार, रंगछटा, विविध प्रकाश किरणांचा साक्षात्कार होत जातो. तोच साक्षात्कार प्रभाकर कोलते यांच्या चित्रांतून त्या अनुभवाची प्रचीती येत राहते. कधी अवकाशातून प्रकाशाचे कवडसे डोकावताना दिसतात, तर कधी धूसर अमूर्त आकार दिसत राहतात. एखादी व्यक्ती मग्न होऊन पाहू लागला की, ते सादृश्य आकार नाहीसे होत जातात व त्याच ठिकाणी नव्या आकारांची प्रचीती येत राहते. अशा प्रकारे दृश्याच्या पलीकडील प्रदेशातून जे काही आकाराला येते, ते प्रत्यक्षात नेहमीच शक्यतेच्या स्वरूपात अस्तित्वात असते; त्या अर्थाने ते पूर्णपणे शून्यातून निर्माण झालेले नसते. आधुनिक कलेचे महान चित्रकार, शिक्षक, लेखक पॉल क्ली यांच्या शब्दांत सांगायचे तर -“Art does not reproduce the seen; rather, it makes the unseen visible.““कला दिसणाऱ्या गोष्टींचे पुनरावृत्ती करत नाही; ती अदृश्याला दृश्यमान करते.”

कोलते यांच्या नावाची आद्याक्षरे (P.K.) आणि पॉल क्ली (Paul Klee) यांच्या नावाची आद्याक्षरे सारखी असणे हा कदाचित निव्वळ योगायोग असेल, मात्र त्यांच्या कलादृष्टीतील नाते योगायोग नव्हे. विचारवंत आणि कला-शिक्षक पॉल क्ली यांच्या सौंदर्यदृष्टीचा कोलते यांच्या प्रारंभीच्या कलाप्रवासावर प्रभाव दिसून येतो. कालांतराने त्यांनी रंग, रेषा, आकार आणि अवकाश यांच्या माध्यमातून स्वतची अशी स्वतंत्र दृश्यभाषा विकसित केली, जी आज ‘कोलते’ शैली म्हणूनच ओळखली जाते.

1946 मध्ये सिंधुदुर्ग जिह्यातील नेरूरपार या गावात जन्मलेल्या प्रभाकर महादेव कोलते यांनी 1968 साली मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी परंपरागत चित्रभाषेच्या चौकटी ओलांडत स्वतची स्वतंत्र दृश्यभाषा शोधण्याचा ध्यास घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1972 ते 1994 या कालावधीत त्यांनी याच संस्थेत अध्यापन केले आणि जवळपास दोन दशके एक संवेदनशील शिक्षक, चिंतनशील कलाकार आणि प्रेरणादायी मार्गदर्शकाची भूमिका निभावली. शिक्षकाची सर्जनशीलता आणि वैचारिक प्रगल्भता विद्यार्थ्यांच्या कलाविकासाला दिशा देत असते, असा त्यांचा ठाम विश्वास होता. या विचारांचा प्रभाव त्यांच्या अध्यापनात सातत्याने जाणवत राहिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी पुढे भारतीय समकालीन कलेत स्वतचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आणि त्यांच्या शिक्षक म्हणून असलेल्या योगदानाची साक्ष देते. कोलतेंनी शिक्षकी वसा घेतला तो प्रकर्षाने प्राध्यापक शंकर पळशीकर, शोलापुरकर, संभाजी कदम, गजानन भागवत यांसारख्या दिग्गज व प्रतिभावंत शिक्षकांकडून, पण तरीही शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात स्वतचा वेगळा ठसा उमटवला. ती शिक्षकांची श्रृंखला त्यांनी आजतागायत कायम जपली.

मुंबईतील केमोल्ड आर्ट गॅलरी येथे 9 जुलै ते 29 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेले “Asymmetrical Synthesis” हे प्रभाकर कोलते यांचे एकल प्रदर्शन त्यांच्या प्रदीर्घ कलातपश्चर्येतील एका नव्या सर्जनशील पर्वाची साक्ष देणारे ठरते. या प्रदर्शनात त्यांच्या अलीकडील चित्रकृतींसह कविता, वैचारिक लेखन, व्याख्याने, वैयक्तिक नोंदी आणि विविध दृश्य-अभिलेख यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रदर्शन केवळ चित्रांचे दर्शन घडवणारे न राहता, कलाकाराच्या विचारविश्वाचा, सर्जनप्रक्रियेचा आणि त्यांच्या बहुआयामी कलाभानाचा सखोल परिचय करून देणारा एक समग्र कलाविष्कार ठरतो. त्यांच्या चित्रात विविध घटकांचे सूक्ष्म विभाजन, नाजूक रंगछटा, ताणांचे बदलते नमुने आणि परस्परांशी संवाद साधणारी अनेक स्तरे हळूहळू उलगडत जातात. या घटकांमध्ये कठोर भेद नसतो, ते एकमेकांना छेद देत, मिसळत आणि समृद्ध करत राहतात.

संवेदनशील चित्रकार, लेखक, कवी अशा प्रत्येक शैलीतून स्वतःची छटा उमटवणारे कोलतेंनी नुकतेच 80 वर्षांत पदार्पण केले. त्यांच्या मताप्रमाणे वय हे फक्त आकडे दर्शवतात. आजही तितक्याच तन्मयतेने, आत्मचिंतनाने आपल्या चित्रांतून अमूर्त भाषेतून चित्र संवाद साधतात. अनेक प्रयोगशील माध्यमांद्वारे मग ते पेंटिंग असो, इन्स्टॉलेशन असो, हॅपनिंग असो, कविता अथवा लेखन असो, त्या त्या माध्यमाद्वारे मळलेल्या पायवाटांच्या विचारांना छेद देत आपले विचार स्वतंत्ररीत्या मांडत राहिले.

“If you want to see your soul, look at the Sun.“ पळशीकर सरांच्या या वाक्याचा शब्दश अर्थ घेऊन प्रभाकर कोलते अनेक दिवस गच्चीवर जाऊन सूर्याकडे एकटक पाहत राहिले, पण त्यांना ‘सोल’ काही दिसला नाही. कालांतराने आत्मचिंतनातून त्यांना या वाक्याचा खरा बोध उमगला- बाह्य सूर्य नव्हे, तर आपल्या अंतरमनातील प्रकाशाकडे अंतर्मुख होऊन पाहिले, तरच आत्मस्वरूपाचे दर्शन घडते. हाच जीवन दृष्टिकोन त्यांनी आपल्या अमूर्त चित्रांतून व्यक्त करत रंग-रेषांच्या माध्यमातून स्वतच्या ‘सोल’चा अखंड शोध घेतला. त्या वैचरिक संवादातून ‘मिसिंग सोल’ या चित्राची निर्मिती केली, ज्याला 1970 साली बॉम्बे आर्ट सोसायटीच सुवर्ण पदक मिळाले. चित्रांमध्ये अंतिम परिणामाचे महत्त्व निश्चितच आहे, परंतु त्याहूनही अधिक महत्त्वाचा आहे तो त्या परिणामापर्यंत पोहोचण्याचा प्रवास- जुन्या रूपांच्या मातीतून सतत नव्या रूपांची अंकुरणारी प्रक्रिया, नवसर्जनासाठी चालणारा अखंड संघर्ष. हाच संघर्ष, हाच संक्रमणाचा प्रवास कोलते यांच्या कलानिर्मितीचा खरा आत्मा आहे.

आज त्यांच्या चित्रविश्वातून सतत नवी दृश्यरूपे जन्म घेतात. त्यांनी पूर्वनिश्चित प्रतीके आणि संकेतांचा त्याग करून स्वतची स्वतंत्र, बहुअर्थी दृश्यभाषा घडवली आहे. तिचा अर्थ बाह्य संकेतांतून नव्हे, तर चित्राच्या अंतर्गत लय, रचना आणि दृश्यसंवेदनांतूनच उलगडत जातो. भूमिगत सर्जनप्रवाह आणि त्याचा शोध घेणारा कलाकार यांच्यातील नेमका संबंध काहीही असो, या अंतप्रेरणेच्या शोधातून जन्मलेल्या कोलते यांच्या चित्रांमुळे प्रेक्षकाची संपूर्ण कल्पनाशक्ती जागृत होते. सजीव हालचाल आणि संपूर्ण स्थैर्य, इंद्रियानुभवातील उत्कटता आणि अंतर्गत प्रेरणांच्या सूक्ष्म जाणिवा यांच्या सीमेवर उभे राहून आपण त्यांच्या चौकटीत बंदिस्त चित्रविश्वाच्या संगीताने मंत्रमुग्ध होतो.

(लेखक प्रख्यात चित्रकार आहेत)