CWG 2026 – ग्लासगोमध्ये हिंदुस्थानच्या जदुमणीची जादू; बॉक्सिंगमध्ये पटकावले रौप्य पदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Commonwealth Games 2026 मध्ये बॉक्सिंगमध्ये पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात हिंदुस्थानच्या जदुमणी सिंगने रौप्य पदक पटकावले आहे. अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाच्या जे डिक्सनविरुद्ध त्याला पराभवाचा सामना करावा लागला. सुवर्ण पदक जिंकण्यासाठी जदुमणी सिंगने जे डिक्सनला कडवी झुंज दिली, मात्र डिक्सनच्या अचूक प्रतिहल्ल्यांमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू सुवर्ण पदक जिंकण्यात यशस्वी ठरला.

पहिल्या फेरीत दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीची टक्कर पाहायला मिळाली. सुरुवातीला डिक्सनने काही सुंदर प्रतिहल्ले करत वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला, परंतु जदुमणीने जोरदार पुनरागमन करत अखेरीस काही यशस्वी पंच मारले. पंचांनी 3-2 अशा स्प्लिट निर्णयाने ही पहिली फेरी जदुमणीच्या बाजूने दिली, ज्यामुळे हिंदुस्थानला सुरुवातीची आघाडी मिळाली होती.
मात्र, दुसऱ्या फेरीत डिक्सनने जबरदस्त पुनरागमन करत सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. जदुमणीने डाव्या हुक्सचा वापर करून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला, मात्र डिक्सनच्या चोख आणि जोरदार प्रतिहल्ल्यांनी सर्व 5 पंचांना प्रभावित केले आणि ही फेरी 5-0 ने त्याच्या नावे झाली. अखेरच्या फेरीत जदुमणीने सुवर्ण पदकासाठी पूर्ण जोर लावला, परंतु डिक्सनने संयम राखत अचूक खेळ केला आणि अंतिम निकालानुसार सर्वसंमतीने विजय मिळवून सुवर्ण पदक आपल्या देशाच्या नावावर केले, तर जदुमणी सिंगला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.