अमित शहा, गो बॅक! केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात पुण्यात जोरदार आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपर फुटीप्रकरणी आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांवरील लाठीहल्लाच्या निषेधार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने सातारा रोड परिसरात आंदोलन करत गृहमंत्र्यांच्या विरुद्ध रान उठवले. ‘गो बॅक गो बॅक, अमित शहा गो बॅक’, ‘अमित शहा गो बॅक’ अशी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी पुणे-सातारा महामार्गावर ठिय्या मांडला. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. आंदोलनामुळे सातारा रस्त्यावर पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने सातारा रस्त्यावरील उत्सव बिल्डींग चौकात जोरदार निदर्शने केली. आंदोलनात काँग्रेसच्या पूर्व विभागाचे अध्यक्ष, नगरसेवक प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी, पुणे मनपा गटनेते रामचंद्र ऊर्फ चंदू कदम यांच्यासह मोठय़ा संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलना दरम्यान काँग्रसच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी उचलून गाडय़ांमध्ये घालून आंदोलन स्थळावरून नेल्यानंतर देखील युवक काँग्रेससह महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यातच ठिय्या मांडून आंदोलन पुढे सुरू ठेवले.

वंचित बहुजन आघाडीच्या कायकर्त्यांनी अमित शहा यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांचे बॅरीकेट्स बाजूला सारून सातारा महामार्ग गाठला. शहराध्यक्ष अॅड. अरविंद तायडे यांच्यासह वंचितच्या 40 ते 50 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

दिल्ली येथे आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्याची जबाबदारी ही गृहमंत्र्यांची आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. विरोधीपक्ष नेते राहूल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नसल्याने दोघे संसदेमध्ये उपस्थित राहत नाही. जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही तोपर्यंत देशभर आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा काँग्रसने दिला.

पोस्टरने वेधले लक्ष

आंदोलनामध्ये ‘गो बॅक हुकूमशहा’ असा उल्लेख असलेले काळे फुगे, अमित शहा आणि अदानी यांचे छायाचित्र असलेले ‘आपण दोघे भाऊ-भाऊ, सगळा देश विकून खाऊ’ असा उल्लेख असलेले पोस्टर, ‘न खाऊंगा न खाने दुंगा, न पढुंगा, न पढणे दुंगा’, ‘शिक्षण मागितलं होतं भाऊ, शिक्षा नाही’, ‘हे पुणे आहे, इथे भल्याभल्यांचा माज उतरवला जातो’, अशा पोस्टर्सने सर्वांचे लक्ष वेधले.

अन् अमितभाई अवतरले

दिल्लीतील विद्यार्थी लाठीहल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत आलेच नाहीत. त्यामुळे ही जोडगोळी कुठे गायब झाली, अशी चर्चा सर्वत्र होती. दिल्लीतून गायब झालेले अमितभाई आज पुण्यात अवतरले, अशी चर्चा शहरात होती.