लवकर मेनोपॉज झाल्यास उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो का? जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेनोपाॅज हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मेनाेपाॅजविषयी आजही अनेक समज गैरसमज हे आपल्याकडे निर्माण होताना दिसत आहेत. मेनोपाॅजमुळे पूर्वीसारखे उत्साहवर्धक जीवन राहत नाही असे म्हटले जाते. परंतु योग्य ती काळजी घेतल्यास याकाळात होणाऱ्या आरोग्याविषयीच्या तक्रारी या कमी होण्यास मदत होते.

महिलांमध्ये साधारणपणे ४५ ते ५५ वर्षांच्या दरम्यान मेनोपॉज येतो. मात्र, काही महिलांमध्ये ४० वर्षांपूर्वीच मेनोपॉज येण्याची स्थिती निर्माण होते. याला प्रीमेच्युअर मेनोपॉज म्हटले जाते. अशा महिलांमध्ये पुढील आयुष्यात उच्च रक्तदाब (हाय बीपी) आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. मेनोपॉज हा आजार नसून शरीरातील नैसर्गिक जैविक बदल आहे. मात्र, तो अपेक्षित वयापूर्वी आल्यास शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाण कमी होते. हे हार्मोन रक्तवाहिन्या लवचिक ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य जपण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे इस्ट्रोजेन कमी झाल्यास रक्तदाब वाढण्याची शक्यता वाढते.

याशिवाय वजन वाढणे, पोटाभोवती चरबी साचणे, शारीरिक हालचाली कमी होणे, तणाव, अपुरी झोप आणि अयोग्य जीवनशैली यामुळेही हृदयविकाराचा धोका अधिक वाढू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक महिलेला उच्च रक्तदाब होईलच असे नाही. मात्र, लवकर मेनोपॉज झालेल्या महिलांनी नियमित रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची तपासणी करणे, संतुलित आहार घेणे, दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करणे, धूम्रपान व मद्यपान टाळणे आणि तणाव नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.