सामना अग्रलेख – नाशिकचे बळी, खड्ड्यात घाला हे सरकार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुण मुले बेरोजगारीने वैफल्य येऊन मरणाला कवटाळीत आहेत व ते कमी म्हणून रस्त्यावरील खड्ड्यांत पाडून माणसे मारली जात आहेत. नाशिक शहर तर खड्ड्यांतून निर्माण झालेले स्मशान बनले आहे. हे फडणवीस-मिंध्यांच्या शासन व्यवस्थेचे अपयश आहे. नाशिकमधील नीलेश कोतकर हे फक्त एका मृताचे नाव नाही. तो महाराष्ट्रातील हजारो नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारा खड्ड्यातला बळी आहे. आज नीलेश, उद्या दुसरा कोणी. माणसे मरत राहतील व भाजपचे ‘चंपतराय’ खोटे अश्रू ढाळीत गुजरातच्या ठेकेदारांबरोबर दलालीचा ‘पट’ मांडून कुंभमेळ्याची तयारी करताना दिसतील. नाशिकसह महाराष्ट्रातील खड्डे हीच राज्याची ओळख बनणार असेल तर खड्ड्यात घाला हे सरकार!

भारतीय जनता पक्षाने राज्यातील बहुतेक सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका जिंकल्या व त्याचा विजय उत्सवही साजरा केला, पण स्थानिक स्वराज्य संस्थांचे नक्की काम काय, नागरिक आणि शहरांना काय सेवा पुरवायच्या याचे ज्ञान नसल्याने मुंबई, नागपूर, नाशिकसारख्या अनेक शहरांत पावसाने जनजीवनाची धूळधाण उडवली आहे. नाशिकमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांचा चौथा बळी गेला. खड्ड्यांमुळे नाशकात किमान साडेपाचशे नागरिक आतापर्यंत जायबंदी झाले आहेत. नाशकात कुंभमेळा होणार म्हणून ज्या ‘चंपतराय’ मंत्र्यांची विशेष नेमणूक देवेंद्र फडणवीस यांनी केली ते गिरीश महाजन अशा दुःखद प्रसंगी कोठे आहेत? मंगळवारी नाशिकमधील अंबड एमआयडीसीतील एक्स्लो पॉईंटजवळ 40 वर्षांचे व्यापारी नीलेश कोतकर यांना रस्त्यावरील खड्डे आणि चिखलाने मृत्युदंड दिला. शहरभर विकासकामांच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यात पावसाने चिखल झालाय. दुचाकीस्वार अशा खड्ड्यांवरून रस्ते समजून पुढे जातात व मृत्यू पावतात. नाशिकच्या महापालिकेला साधे खड्डे बुजवायचेही जमत नसेल तर ही महापालिका बरखास्त करून नाशिकच्या पालिका आयुक्त व महापौरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा. नाशिक महापालिकेची सत्ता भाजप व मिंधे टोळीकडे आहे. या दोघांनी मिळून नाशिककरांच्या जिवाशी खेळ मांडला आहे. रस्ते राहिलेले नाहीत. खड्डे राक्षसासारखे, मृत्यूच्या जबड्याप्रमाणे बळी घेत आहेत. त्याविरोधात शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिकेत महापौर दालनातच तब्बल सहा तास ठिय्या आंदोलन केले आणि सत्ताधारी भाजप-मिंधे गटाच्या कारभाराचे वाभाडे काढले. पण सरकारमध्ये खुर्च्या उबविणारे नाशिकचे मंत्री कुठे तोंड लपवून बसले आहेत? विधान परिषद निवडणुकीच्या वेळी धावाधाव करणारे हे मंत्री नाशिकमधील खड्ड्यांनी निरपराध्यांचे बळी घेतले तरी

ना तोंड दाखवीत आहेत

ना तोंड उघडत आहेत. नाशिकला दत्तक घेऊन विकासाची बोंब मारणाऱ्या, परंतु स्वतःच्या राजकारणासाठी नाशिकला पालकमंत्री न देणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनाही आता जाब विचारावाच लागेल. नाशिक महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने प्रत्येक प्रभागात किमान पंचवीस कोटी खर्च केले, तर मिंध्यांनी पन्नास कोटींचा जोर लावला. त्यामुळे या पैशांच्या वसुलीसाठी महापालिका मर्जीतल्या ठेकेदारांना चालवायला दिल्याचेच चित्र आहे. वीर सावरकरांनी क्रांतीची ठिणगी ज्या नाशकात टाकली ती खड्ड्यांत पडून विझून गेली. सावरकरांच्या काळात भाजपची सत्ता असती तर जॅक्सनचा वध करावा लागला नसता. तो स्वतःच रस्त्यावरील खड्ड्यात पडून मेला असता. कुसुमाग्रजांनाही ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ हे स्फूर्ती गीत लिहिण्याची प्रेरणाच झाली नसती. कारण कुसुमाग्रजांच्या डोळ्यांसमोर नाशिकच्या खड्ड्यात ब्रिटिश सोल्जर मेले असते व तात्यासाहेबांनी लिहिले असते, ‘‘गर्जा जयजयकार खड्डय़ांचा… गर्जा जयजयकार!’’ आता कदाचित भाजपवाले नाशिकच्या खड्ड्यांवर शालेय पुस्तकांत धडे घालतील व खड्ड्यांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक फायद्यांचे विवेचन करतील. इतका निर्लज्जपणा भाजपच्या अंगात नक्कीच आहे. त्या निर्लज्जपणाची फळे आज महाराष्ट्राची जनता भोगत आहे. पुन्हा रस्त्यांची ही दुरवस्था फक्त नाशिकपुरती मर्यादित नाही. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड जिह्यांतही जिथे नजर टाकावी तिथे रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. मुंबई-ठाण्याच्या रस्त्यांची तर दैना झाली आहे आणि महापालिकेतल्या मिंधे-भाजपच्या सत्ताधाऱ्यांना त्या खड्ड्यांत घालण्यासाठी नव्याकोऱ्या गाड्या हव्या आहेत. नांदेडमध्ये तर रस्त्यावर पडलेल्या 15 फुटांच्या महाकाय खड्ड्यात प्रा. चंद्रशेखर एंगडे यांची संपूर्ण कारच पडली. सुदैवाने वेळीच बाहेर उडी मारल्याने प्रा. एंगडे यांचा जीव वाचला असला तरी नांदेड महापालिकेतील

सत्ताधारी भाजपचा कारभार

कसा खड्ड्यात गेला आहे, हेच या घटनेने सिद्ध केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदर्श नागपुरात पावसाने चिखल, घाणीचे साम्राज्य निर्माण केले. कोणतेही नियोजन नसल्याने नागपूर बुडून गेले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई, रस्ते दुरुस्तीचे दावे केले जातात. निविदा काढल्या जातात. बिले मंजूर केली जातात. त्याआधी पंचवीस टक्के कमिशन खिशात घातले जाते, पण ना रस्ते होतात ना खड्डे बुजवले जातात. त्या खड्ड्यांत अपघात होतात. काहींचा मृत्यू होतो, काहींना अपंगत्व येते. त्याची भरपाई कोणीच करू शकत नाही. रस्त्यांवरील खड्डे हे राज्यकर्त्यांचे जीवघेणे दुर्लक्ष आहे. जेव्हा एखाद्या खड्ड्यामुळे माणूस मरतो तेव्हा तो फक्त एक अपघात नसतो, ते शासन व्यवस्थेचे अपयश असते. हे मृत्यूचे सापळे सरकारी कृपेने निर्माण झाले आहेत. राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत, विद्यार्थी पेपरफुटीमुळे आत्महत्या करीत आहेत. तरुण मुले बेरोजगारीने वैफल्य येऊन मरणाला कवटाळीत आहेत व ते कमी पडते म्हणून रस्त्यावरील खड्ड्यांत पाडून माणसे मारली जात आहेत. नाशिक शहर तर खड्ड्यांतून निर्माण झालेले स्मशान बनले आहे. हे फडणवीस-मिंध्यांच्या शासन व्यवस्थेचे अपयश आहे. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन, राज्य सरकार आणि सगळ्यात शेवटी केंद्रीय रस्ते मंत्री एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत आणि नागरिक मात्र रोज खड्ड्यात, नाल्यात, उघड्या मॅनहोलमध्ये पडून मरत आहेत. नाशिकमधील नीलेश कोतकर हे फक्त एका मृताचे नाव नाही. तो महाराष्ट्रातील हजारो नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारा खड्ड्यातला बळी आहे. आज नीलेश, उद्या दुसरा कोणी. माणसे मरत राहतील व भाजपचे ‘चंपतराय’ खोटे अश्रू ढाळीत गुजरातच्या ठेकेदारांबरोबर दलालीचा ‘पट’ मांडून कुंभमेळ्याची तयारी करताना दिसतील. नाशिकसह महाराष्ट्रातील खड्डे हीच राज्याची ओळख बनणार असेल तर खड्ड्यात घाला हे सरकार!