लहान मुलांनाही थायरॉईडचा धोका! पालकांनी या महत्त्वाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थायरॉईड ही अशी समस्या आहे ज्यामुळे शरीराचे वजन एकतर झपाट्याने कमी होते किंवा वाढते. ही आपल्या गळ्यात असलेली एक ग्रंथी असते. आपण जे काही खातो त्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचे काम ही ग्रंथी करते. थायरॉईडचे मुख्यत्वे दोन प्रकार असतात ते म्हणजे हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम.

तज्ज्ञांच्या मते, अनेकांना वाटते की थायरॉईड फक्त मोठ्या वयाच्या लोकांनाच होतो. पण लहान मुलांमध्येही थायरॉईडची समस्या उद्भवू शकते, विशेषतः हायपोथायरॉईडीझम. याचा अर्थ असा की, थायरॉईड ग्रंथी शरीराच्या गरजेनुसार पुरेसे थायरॉईड संप्रेरक तयार करत नाही. मुलांची योग्य शारीरिक वाढ, मेंदूचा विकास आणि शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हे संप्रेरक अत्यंत आवश्यक असतात. मुलांमध्ये थायरॉईडची कोणती लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, याबद्दल तज्ज्ञांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.

पालकांनी मुलांच्या कोणत्या लक्षणांकडे लक्ष द्यावे?

  • शारीरिक वाढ मंदावणे: जर तुमच्या मुलाची उंची किंवा शारीरिक वाढ त्याच्या वयानुसार मंदावली असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
  • सतत थकवा जाणवणे: पुरेशी झोप झाल्यानंतरही जर मुलं नेहमी थकलेली दिसत असतील तर, त्याला फक्त आळस समजून दुर्लक्ष करू नका.
  • अभ्यासात मन न लागणे: मुलाला अभ्यासात लक्ष केंद्रीत करण्यास अडचण येत असेल, गोष्टी लक्षात ठेवण्यात त्रास होत असेल तर, त्यामागे थायरॉईड हे कारण असू शकते.
  • वजन वाढणे आणि बद्धकोष्ठता: कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन वाढत असेल आणि सोबतच बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर हे हायपोथायरॉईडीझमचे लक्षण असू शकते. कारण थायरॉईड कमी काम करू लागल्यास शरीराचे मेटाबॉलिझम (चयापचय) आणि पचनसंस्था दोन्ही मंदावतात.
  • थंडी वाजणे आणि त्वचा कोरडी पडणे: जर तुमच्या मुलाला इतरांच्या तुलनेत जास्त थंडी वाजत असेल. तसेच त्याची त्वचा खूप कोरडी पडत असेल किंवा मानेच्या पुढील भागात सूज दिसत असेल, तर या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

थायरॉईडवर योग्य उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे जर मुलामध्ये ही लक्षणे एकत्र दिसत असतील, तर बालरोगतज्ज्ञांना नक्की दाखवा. एका सोप्या रक्तचाचणीने याचे निदान होते. वेळेवर उपचार सुरू झाल्यास मुलाची शारीरिक व मानसिक वाढ पूर्ववत आणि सामान्यपणे होऊ शकते.