उंदराची ‘हाय-प्रोफाइल’ चोरी! 10 लाखांचा हिरा केला लंपास, CCTV फुटेज पाहून सर्वजण अवाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकातील तुमकुरु शहरातून एक अत्यंत अचंबित करणारी घटना समोर आली आहे. येथील एका ज्वेलरी शॅापमधून तब्बल 10 लाख रुपये मूल्याचे हिरे आणि सोन्याचे दागिने रातोंरात गायब झाले. सुरुवातीला चोरी झाल्याचे समजून दुकानदाराच्या पायाखालची जमीन सरकली, मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर समोर आलेले सत्य पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चोरी करणारा कोणताही सराईत गुन्हेगार नसून एक उंदीर असल्याचे समोर आले आहे.

तुमकुरुच्या कैलटेक्स सर्कसजवळ असलेल्या ‘विश्वास ज्वेलरी शॅाप’मध्ये घडलेल्या या घटनेने एकच चर्चा रंगवली आहे. चोरीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कर्मचारी दुकानात पोहोचले तेव्हा सुमारे 50 ग्रॅम वजनाचे हिरेजडीत अंगठ्या आणि सोन्याचे हार यांसारखे मौल्यवान दागिने गायब असल्याचे दिसून आले. याचा शोध घेत असताना दुकानाचे शटर सुरक्षित असून बळजबरीने घुसल्याची कोणतीही खूण नसल्याने कर्मचाऱ्यांनी पोलिसात जाण्यापूर्वी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला. फुटेज पाहताना एक उंदीर तोंडाने हे सोन्या-हिऱ्याचे दागिने ओढत एका कोपऱ्यात घेऊन जाताना स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाला.

या अजब घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी उंदराचा माग काढत दुकानातील बिल आणि इतर साहित्याची कसून तपासणी केली. तपासणी दरम्यान उंदराने लपवून ठेवलेले सर्वच्या सर्व 10 लाख रुपयांचे दागिने सुरक्षितपणे जप्त करण्यात आले असून, त्यात 10 अंगठ्या आणि 3 नेकलेसचा समावेश आहे. या सिनेस्टाईल घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, या अनोख्या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.