
दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यावरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक झाले. विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला कुणी केला? याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत निवेदन द्यावं, या मागणीसाठी विरोधकांनी राज्यसभा व लोकसभा दणाणून सोडली आहे. संसद भवनाबाहेर सरकारविरोधात ‘ऑर्डर किसने दिया’ अशी घोषणाबाजी करत विरोधक आंदोलन करत आहेत. सरकारच्या या भूमिकेवर काँग्रेसचे राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी निशाणा साधला. गृहमंत्री अमित शहा यांनी या विषयावर काहीही न बोलल्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाला अप्रत्यक्षपणे त्यांची सहमती असल्याचे सिद्ध होत असल्याचा दावा सिब्बल यांनी केला आहे.
संसद भवन परिसरात माध्यमांशी बोलताना कपिल सिब्बल म्हणाले की, जर कोणी गोळीबार केला असेल किंवा पेलेट गनच्या वापराने कोणाला दुखापत झाली असेल तर, त्यासाठी नक्कीच कोणाकडून ना कोणाकडून अधिकृत परवानगी आली असणार. जर एसडीम (SDM) यांनी या गोष्टीची परवानगी दिली असेल तर, एसडीएमने चुकीचे कृत्य केल्याबद्दल गृहमंत्र्यांनी त्यांना जाब विचारला का? मग गृहमंत्री यावर अजूनही शांत का आहेत? त्यांचे याबाबत मौन बाळगणे म्हणजे हे सर्व प्रकार त्यांच्या संमतीनेच घडले आहेत, असे स्पष्टपणे दर्शवते आहे. जर तसे नसते तर, गृहमंत्री अमित शहा यांनी समोर येऊन जाहीरपणे हे स्पष्ट केले असते की, प्रशासकीय अधिकाऱ्याने घेतलेला हा निर्णय चुकीचा होता, असे कपिल सिब्बल यावेळी म्हणाले.
#WATCH | Delhi: Rajya Sabha MP Kapil Sibal says, “It is clear that if someone opened fire or caused injuries using a pellet gun, someone must have authorized it. If the SDM granted permission, has the Home Minister ever said the SDM acted wrongly? Why is the Home Minister silent?… https://t.co/ltxrAYbep2 pic.twitter.com/y1fAXsDaba
— ANI (@ANI) July 30, 2026
कपिल सिब्बल यांनी भाजप सरकारच्या सुरुवातीच्या भूमिकेचाही समाचार घेतला. सुरुवातीला भाजपने विद्यार्थ्यांवर पेलेट गनचा वापर झाल्याचे मान्य केले नव्हते. परंतु, जेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आंदोलकांच्या चेहऱ्यावरील आणि शरीरावर झालेल्या गंभीर जखमांचे पुरावे सादर केले, तेव्हा सरकारला नाईलाजास्तव पेलेट गनचा वापर झाल्याचे मान्य करावे लागले. त्यामुळे गृहमंत्री संसदेत येत नाहीत, असे म्हणत सरकारच्या दुटप्पीपणावर सिब्बल यांनी हल्लाबोल केला.
सरकारच्या या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत सिब्बल यांनी गृहमंत्र्यांवर निशाणा साधला. ही सर्व परिस्थिती पाहता गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. परंतु, प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की, ते ना संसदेत येत आहेत, ना यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करत आहेत आणि ना ही आपल्याकडून कोणती चूक झाली आहे हे प्रामाणिकपणे कबूल करत आहेत. मात्र, संसदेत येऊन त्यांना याचे उत्तर द्यावेच लागेल, असे सिब्बल यावेळी म्हणाले.




























































