
पाकव्याप्त कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार झाला. निवडणुकीदरम्यान रावलकोटमध्ये निदर्शने करणाऱ्यांवर पाकिस्तानी सुरक्षा दलाने गोळीबार केला. त्यात 19 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. यावरून सत्ताधारी पाकिस्तानी मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.
विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्ताधाऱ्यांवर गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. त्यातून मोठय़ा प्रमाणात निदर्शने करण्यात आली. सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान अनेक मतदान पेंद्रांवर चकमकी उडाल्या. जॉइंट अवामी अॅक्शन कमिटीच्या (जेएएसी) नेतृत्वाखाली रावळकोटच्या ईदगाह मैदानावर हजारो लोकांनी पाकिस्तान सरकार आणि तेथील सत्ता व्यवस्थेविरोधात मोर्चा काढून निदर्शने केली. जेएएसीने सरकारला मागण्यांबाबत 27 जुलैपर्यंत मुदत दिली होती. मात्र, मागण्या मान्य झाल्यानंतर लोकांनी मुझफ्फराबादच्या दिशेने मोर्चा काढला. त्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर रावळकोट आणि सुधनोती जिह्यातील निवडणुका 10 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्या आहेत.
निवडणुका अवैध, हिंदुस्थानकडून मान्यता नाही
पाकव्याप्त कश्मीरमध्ये होत असलेल्या या निवडणुका हिंदुस्थानने अवैध असल्याचे म्हटले आहे. या निवडणुकांच्या माध्यमातून पाकिस्तान या भागातील अवैधरीत्या ताबा असलेला भाग लपविणे आणि तेथील मानवाधिकाराच्या उल्लंघनावरून जगाचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हिंदुस्थानने केला आहे. लोकांचे शोषण आणि सरकारच्या दडपशाहीमुळे पाकव्याप्त कश्मीरमध्ये निदर्शने होत असल्याचे परराष्ट्र प्रवत्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.
निवडणुकीवर बहिष्कार
पाकव्याप्त कश्मीरमधील विधानसभा निवडणुकीवर अनेक ठिकाणी बहिष्कार टाकण्यात आला आहे. धाडियाल येथील गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलमधील मतदान पेंद्रावर एकही मतदार पोहोचला नाही.




























































