
जुनेद व सैफीने ‘जंतर मंतर’वर भुकेल्या पोरा-पोरींना खायला दिले हा त्यांचा अपराध ठरला आहे. कारण ‘जंतर मंतर’वरील लढा देशातील हुकूमशाहीविरोधात होता. घोषणा देणारे उपाशी होते. ते उपासमारीनेच मरायला हवे होते असे भाजपला वाटणे साहजिक होते, पण जुनेद-सैफीसारख्यांनी ‘जंतर मंतर’वर उपासमार होऊ दिली नाही. तेथील गुरुद्वारांचे लंगर या मुलांसाठी अहोरात्र सुरू होते. हाच खरा धर्म आहे. जुनेद-सैफी यांचा त्यासाठी छळ सुरू झाला असेल तर सोनम वांगचुक, अभिजीत दीपके व समस्त मानवतावाद्यांनी पुन्हा एकदा युद्धाचे रणशिंग फुंकायला हवे! जुनेदचे ‘जंतर मंतर’वरील लढ्यातील योगदान विसरता येणार नाही.
‘जंतर मंतर’वरचे युद्ध तूर्तास संपले आहे. ‘काॅक्रोच जनता पार्टीच्या तरुण तुर्कांनी जल्लोष केला’, ‘श्रमपरिहार केला’ अशा बातम्या, छायाचित्रे भाजप आयटी सेलकडून प्रसिद्ध केली जात आहेत. जणू काही या पोरांनी मोठा अपराधच केला व या अपराधाला माफी नाही असे भाजपच्या उरल्यासुरल्या अंधभक्तांकडून सांगितले गेले. मुळात ‘जंतर मंतर’वरचे आंदोलन हे ‘रडके’ आंदोलन नव्हते, तर तरुणाईचा जबरदस्त उत्सव होता. पोलिसांच्या लाठ्या, पॅलेट गन्स, खिळ्यांच्या लाठ्या, अश्रुधुराची नळकांडी पचवूनही तरुणाईच्या चेहऱ्यावर वेदनेच्या छटा नव्हत्या. त्यामुळे आंदोलन संपल्यावर झुरळे एखाद्या बैठकीत बसून विचारविनिमय करीत असतील तर भाजपाई विंचवांच्या नांग्या दुखायचे कारण नाही. या सगळ्या आनंद उत्सवात हरवले आहेत ते मुहम्मद जुनेद आणि शदाब सैफी. ‘जंतर मंतर’वरील आंदोलनाचे ते प्रमुख हिस्सेदार होते व त्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पोलिसांनी जुनेद आणि त्याच्या कुटुंबाचा छळ आरंभला आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून जुनेद ‘जंतर मंतर’वरील सर्व आंदोलकांना जेवण आणि पाणी पुरवत होता. त्याच्या पायांना जखमा झाल्या होत्या तरी एकही आंदोलक उपाशी राहू नये म्हणून तो धावपळ करीत होता. इकडून तिकडून ‘जुगाड’ करून ‘जंतर मंतर’वर खाण्यापिण्याची चोख व्यवस्था करीत होता. आंदोलकांना ‘रसद’ मिळू नये म्हणून पोलिसांनी कॅनॉट प्लेस भागातील सर्व हॉटेल्स, रस्त्यावरील फूड स्टॉल्स बंद केले. ‘स्विगी’ वगैरे यंत्रणा बंद करून ‘जंतर मंतर’वर
उपासमार होईल याची व्यवस्था
केली, पण इतके करूनही जुनेद व सैफची भोजन व्यवस्था सुरूच राहिली आणि ‘जंतर मंतर’वरचे आंदोलन संपेपर्यंत जुनेद ही सेवा देत राहिला. ‘जंतर मंतर’वर जमलेला प्रत्येक कार्यकर्ता, विद्यार्थी जुनेदचे आभार मानत होता. अर्थात, जुनेदने हे सर्व केले ते एका माणुसकीच्या दृष्टिकोनातून. देशाच्या कानाकोपऱ्यांतून जंतर मंतरवर आलेली ही मुले. कोणी 20 रुपये घेऊन आले, कोणी अनवाणी, उपाशीच निघाले. त्यांना जेवण देणारा जुनेद हा सरकारचा अपराधी ठरला आहे. जुनेदचा, त्याच्या मुलाबाळांचा, आई-वडील, बहीण, तिचे सासरे यांचा पोलिसांनी छळ सुरू केला आहे. जुनेद व त्याच्या कुटुंबीयांना अचानक उचलून पोलीस स्टेशनात नेले जात आहे. 12-12 तास बसवून ठेवले जात आहे. जुनेदला तर त्याने आंदोलकांना पुरवलेल्या प्रत्येक ‘दाण्या’चा हिशेब विचारला जात आहे. जुनेद हा एक साधा माणूस आहे. तरीही 35 दिवस त्याने हजारो लोकांना जेवण दिले. हा खर्च कोणी केला? याचा शोध पोलीस घेत आहेत. जुनेदला ‘फंडिंग’ कोणी केले? हा भारत सरकारच्या शोध मोहिमेचा महत्त्वाचा भाग आहे. पहलगाममध्ये अतिरेकी घुसले व त्यांनी 27 पर्यटकांना मारले. त्या अतिरेक्यांचा शोध घेणे सरकारला जमले नाही. पुलवामात 40 जवानांची ‘बस’ आरडीएक्स स्फोटात उडवली गेली. त्या आरडीएक्सचा जनकही सरकारने शोधला नाही, पण जुनेदचा पाठीराखा कोण हे शोधण्यासाठी अमित शहा, मोदी वगैरे लोकांनी संपूर्ण
केंद्र सरकारला कामास
लावले. जुनेदकडे ‘जंतर मंतर’वरील खाण्यापिण्याचा हिशेब मागितला जात आहे. कारण त्याला दाढी होती आणि त्याच्या डोक्यावर टोपी होती. या सरकारला माणुसकी, राष्ट्रभक्ती वगैरेशी काही देणेघेणे नाही. त्यामुळेच जुनेदने इतका खर्च कसा केला? असा प्रश्न त्यांना पडला आहे आणि त्याच्या उत्तरासाठी त्याला व त्याच्या कुटुंबीयांना त्रास दिला जात आहे. वास्तविक, हा असा शोध घेण्याची गरज ‘पी. एम. केअर फंड’ नामक महाघोटाळ्यात आहे. पी.एम. केअर फंड कोरोना काळात स्थापन झाला. सरकारी ‘निधी’ असल्याचे भासवून त्यात हजारो कोटी जमा केले गेले. त्या ‘कोषा’त नेमके कोणी किती पैसे टाकले व का? त्या सर्व पैशांचे नेमके स्वामित्व कोणाकडे? हेसुद्धा देशाला कळू द्या. भाजपच्या कोषात व निवडणूक निधी खात्यात हजारो कोटी जमा झाले. ते कोणत्या मार्गांनी? त्याचाही तपास होऊ द्या. जुनेद व सैफीने ‘जंतर मंतर’वर भुकेल्या पोरा-पोरींना खायला दिले हा त्यांचा अपराध ठरला आहे. कारण ‘जंतर मंतर’वरील लढा देशातील हुकूमशाहीविरोधात होता. घोषणा देणारे उपाशी होते. ते उपासमारीनेच मरायला हवे होते असे भाजपला वाटणे साहजिक होते, पण जुनेद-सैफीसारख्यांनी ‘जंतर मंतर’वर उपासमार होऊ दिली नाही. तेथील गुरुद्वारांचे लंगर या मुलांसाठी अहोरात्र सुरू होते. हाच खरा धर्म आहे. जुनेद-सैफी यांचा त्यासाठी छळ सुरू झाला असेल तर सोनम वांगचुक, अभिजीत दीपके व समस्त मानवतावाद्यांनी पुन्हा एकदा युद्धाचे रणशिंग फुंकायला हवे! जुनेदचे ‘जंतर मंतर’वरील लढ्यातील योगदान विसरता येणार नाही.






























































