
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गा’वर मंगळवारी दुपारी तासभराचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. बुलढाणा आणि जालनादरम्यान दुपारी 12 ते 1 या वेळेत गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत बुलढाणा-जालनादरम्यान मुंबई मार्गिकेवरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गावरील वाहतुकीच्या अत्याधुनिक व्यवस्थापनासाठी ‘इंटेलिजंट ट्रफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अपघात रोखण्यासाठी अत्यावश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत. याच धोरणानुसार सध्या ‘आयटीएमएस’ यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाअंतर्गत महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यात येत आहे. या कामासाठी आवश्यकतेनुसार वाहतूक ब्लॉक घेण्यात येत आहेत.






























































