
आजकाल बहुतेक मुलांना पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, चिप्स आणि इतर जंक फूड खायला आवडते. या पदार्थांच्या चांगल्या चवीमुळे मुले ते पुन्हा पुन्हा खाण्याचा हट्ट करतात, पण रोज जंक फूड खाल्ल्याने शरीराला आवश्यक घटक मिळत नाहीत. त्यामुळे मुलांच्या आहारात आरोग्यदायी आणि घरी बनवलेले अन्न तयार करणे आवश्यक असते. आरोग्यदायी अन्न शरीराच्या चांगल्या विकासासाठी मदत करते. या पदार्थांमध्ये असलेले प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह आणि लोहासारखे इतर आवश्यक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. घरी बनवलेले आरोग्यदायी पदार्थ बनवल्याने हळूहळू मुलांची जंक फूड खाण्याची सवय कमी होऊ शकते.
व्हेजिटेबल आणि ओट्स पॅनकेक
मुलांना जंक फूडमधील पॅनकेक किंवा पिझ्झा आवडतो, त्याला व्हेजिटेबल आणि ओट्स पॅनकेक एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे. हे बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप ओट्स किंवा रवा मिक्सरमध्ये बारीक केलेले , 1/2 कप दही, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, किसलेले गाजर, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घाला. आणि याचे मध्यम घट्ट पीठ तयार करा. पॅन/तव्याला हलके तेल किंवा तूप लावा आणि त्यावर छोटे-छोटे पॅनकेक पसरवा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर छान शेकून घ्या. हे पॅनकेक मुलांच्या आवडीच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व्ह करा.
पनीर आणि व्हेज कटलेट
बाहेर मिळणाऱ्या टिक्की किंवा कटलेटपेक्षा हे कटलेट अधिक पौष्टिक असतात आणि मुलं आवडीने खातात. यासाठी बाउलमध्ये 1 कप किसलेले पनीर, उकडवून मॅश केलेले 2 बटाटे, 1/2 कप मिक्स भाज्या बारीक चिरून, १/२ चमचा चाट मसाला, हिरवी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण तयार करुन घ्या. या मिश्रणाचे गोल किंवा कटलेटच्या आकाराचे गोल तयार करा. नंतर तव्यावर थोडे तूप किंवा तेल टाकून हे कटलेट दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत शेका. आणि टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करा.
व्हेज चीज रोल
शिल्लक राहिलेली किंवा ताजी पोळी वापरून मुलांसाठी कुरकुरीत आणि चीजने भरलेला टेस्टी रोल बनवता येतो. हे बनवण्यासाठी 1 किंवा 2 पोळ्या घ्या , बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, गाजर, किसलेले चीज आणि पनीर घ्या. एका कढईत थोडे बटर टाकून सर्व भाज्या हलक्या परतून घ्या जेणेकरून त्यांचा क्रंच राहील. त्यात चाट मसाला आणि मीठ घाला. त्यानंतर तव्यावर पोळी हलकी गरम करून घ्या. पोळीवर टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी लावा. मध्ये परतलेल्या भाज्या आणि वरून भरपूर चीज टाका. त्यानंतर पोळीचा घट्ट रोल करा आणि तव्यावर बटर लावून दोन्ही बाजूंनी कुरकुरीत शेका.
स्प्राउट्स आणि कॉर्न भेळ
स्ट्रीट फूडची चव देणारी ही भेळ प्रोटीन आणि फायबरने भरपूर असते. ही बनवण्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये 1 कप उकडलेले मोड आलेले मूग/मटकी , 1/2 कप उकडलेले स्वीट कॉर्न, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 टोमॅटो, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चाट मसाला घालून चांगले मिक्स करा. ही झटपट बनणारी आणि चटपटीत भेळ मुलांसाठी स्नॅक्स म्हणून उत्तम आहे.
मखाना आणि नट्स चिवडा
चिप्स आणि कुरकुरे ऐवजी हा चिवडा मुलांसाठी एक हेल्दी स्नॅक पर्याय आहे. कढईत 1चमचा तूप गरम करा त्यामध्ये त्यात बदाम, काजू आणि शेंगदाणे मंद आचेवर हलके तळून घ्या. त्यानंतर त्यात 2 कप मखाना कुरकुरीत होईपर्यंत चांगले परतून घ्या. शेवटी त्यावर काळे मीठ आणि चाट मसाला टाकून सर्व मिक्स करा. थंड झाल्यावर हा चिवडा हवाबंद डब्यात भरून ठेवा.
























































