
हरियाणाच्या पानिपतमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेच्या पायाला फ्रॅक्चर झाले असताना डॉक्टरांनी तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला.
टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेला फ्रॅक्चर झालेल्या पायावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्यांना माहिती न देता हृदयात स्टेंट टाकला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी रुग्णालय आणि एका अज्ञात डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
गुड्डी देवी (42) असे मयत महिलेचे नाव आहे. 21 जुलै रोजी गाझियाबादमध्ये झालेल्या एका अपघातात गुड्डी देवीचा पाय मोडला होता. त्यानंतर, 24 जुलै रोजी तिला उपचारासाठी पानिपतमधील पार्क हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर 25 जुलै रोजी डॉक्टरांनी त्यांना माहिती न देता आणि लेखी परवानगीशिवाय महिलेच्या हृदयात स्टेंट टाकला. परवानगी पत्रावर बनावट सह्या केल्याचाही कुटुंबीयांनी आरोप केला आहे. स्टेंट टाकल्यानंतर महिलेची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. कारवाई न करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने त्यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, सेक्टर-29 पोलीस ठाण्याने पार्क हॉस्पिटल आणि एका अज्ञात डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय नोंदींसह सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, रुग्णालयाच्या सीईओ सपना यांनी कुटुंबीयांचे आरोप फेटाळून लावले आहेत. पायाच्या शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्यापूर्वीच्या तपासणीत हृदयाची गंभीर समस्या आढळून आली होती. त्यानंतर अँजिओग्राफी करण्यात आली, ज्यामध्ये धमनीत अडथळा असल्याचे उघड झाले. कुटुंबीयांना याबद्दल पूर्णपणे माहिती देण्यात आली होती आणि त्यांच्या संमतीनंतरच स्टेंट टाकण्यात आला, असे दावा सीईओ सपना यांनी केला आहे.

























































