आसाममध्ये पूरपरिस्थिती गंभीर आत्तापर्यंत 68 जणांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे, मृतांचा आकडा 68 वर पोहोचला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये 52.4 लाखांहून अधिक लोक अजूनही पुराच्या तडाख्यात आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) सांगितले की, चराईदेव, गोलाघाट, जोरहाट, नागाव आणि शिवसागर जिल्ह्यांमध्ये 5 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. रविवारी रात्री उशिरा जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, गेल्या 24 तासांत चराईदेव जिल्ह्यात पुराच्या पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे एकूण मृतांचा आकडा वाढला आहे.

 

चराईदेव जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून, अंदाजे 1.9 लाख लोक प्रभावित झाले आहेत. शिवसागरमध्ये 1.5 लाखांहून अधिक लोक, तर जोरहाटमध्ये अंदाजे 1.4 लाख लोक प्रभावित झाले आहेत. शनिवारी सहा जिल्ह्यांमध्ये अंदाजे 65.5 लाख लोकांना फटका बसला होता. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) माहितीनुसार, अधिकारी चार जिल्ह्यांमध्ये 354 मदत शिबिरे आणि मदत वितरण केंद्रे चालवत असून बेघर लोकांना निवारा देत आहेत. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.

 

लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि पोलीस अप्पर आसामच्या विविध भागांमध्ये बचाव कार्य करत आहेत. सध्या राज्यभरातील 763 गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून, 48 हजार हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) सांगितले की, अनेक जिल्ह्यांमध्ये बंधारे, रस्ते, पूल आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, नुमालीगडमधील धनसिरी नदी अजूनही धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे.